आपण प्रवासात असताना किंवा कोणत्याही कामासाठी बाहेर गेलेलो असताना अनोळखी व्यक्तीशी बोलू नये किंवा त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये. तसे केल्यास फसवणूक होण्याची शक्मयता असते, अशी समजूत आहे. सर्वसाधारणपणे माणसे बाहेर गेल्यानंतर हे पथ्य पाळतात. तथापि, एका अनोळखी व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे वागल्याने अमेरिकेतील एक महिला कोटय़धीश बनली आहे.
ही महिला एका पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी उभी असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्याकडे येऊन तिला 30 डॉलरचे लॉटरी तिकीट खरेदी करण्याचा आग्रह केला. प्रारंभी तिला हा काही तरी फसवणुकीचा प्रकार आहे, असे वाटले. त्यामुळे तिने तिकीट घेण्यास नकार दिला. तथापि, या अनोळखी व्यक्तीने आपला आग्रह सोडला नाही. 30 डॉलर्सचे हे तिकीट घेतल्यास 30 लाख डॉलर्स मिळतील, असा शब्द त्याने दिला. शेवटी एक प्रयोग करून पाहू, अशा भावनेने तिने हे तिकीट विकत घेतले. तिकीट घेतल्यानंतर काही दिवसांनी हा विषय तिच्या डोक्मयातूनही गेला. मात्र, नंतर लॉटरी फुटल्यानंतर तिला 31 कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याचे लक्षात आले. तिकीट घेऊन ती लॉटरी कंपनीच्या कार्यालयात गेली. तिकिटाची पडताळणी केल्यानंतर तिला रकमेचा चेक देण्यात आला. तिने या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. पण तिला यश आले नाही. सध्या ती आपल्या नशिबाचे आभार मानत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या महिलेचे नाव आणि ओळख घोषित करण्यात आली नसली तरी या लॉटरी कंपनीने ही घटना खरी असल्याचे स्पष्ट केले आहे.