गेल्या वर्षीचा स्वतःचाच मोडला विक्रम
प्रतिनिधी /वास्को
दाबोळी विमानतळाने नववर्षांला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या काळात विक्रमी संख्येने प्रवासी हाताळणी केली. 24 तासांत दाबोळी विमानतळावर 104 विमानांचे आगमन झाले. मागच्या वर्षी याच काळात 102 विमानांची नोंद झाली होती. यंदा दाबोळी विमानतळाने मागच्या वर्षीचा विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम केला आहे.
24 तासांत देश विदेशातून आलेल्या 104 विमानांमधून 13147 हवाई प्रवाशांचे आगमन झाले तर याच विमानांतून 17335 प्रवाशांनी उड्डाण केले. एकूण जवळपास 31 हजार प्रवाशांना दाबोळी विमानतळाने 24 तासांत सेवा दिली.
दाबोळी विमानतळ प्राधिकरणाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी याच काळात चोवीस तासांत 102 हवाई जहाजे दाबोळीच्या धावपट्टीवर उतरली होती. तर यंदा 104 हवाई जहाजे 13147 प्रवाशांसह दाबोळीत उतरली. तर याच विमानांतून 17335 प्रवाशांनी परतीच्या प्रवासाला उड्डाण केले. नववर्षांला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने यंदा देशी व विदेशी पर्यटकांनी गोव्याला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम दाबोळी विमानतळावरील हवाई प्रवासी हाताळणीवर झाला.
मोपावर इंडिगोचे पहिले विमान गोव्यातील नवीन मोपा विमानतळावरील हवाई वाहतूक गुरुवारपासून सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स, गो फर्स्ट, आकासा एअरलाईन्स, ओमान एअरवेजसह विविध हवाई कंपन्यांनी आपली हवाई सेवा मोपावरील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केलेले आहे. उद्या गुरुवारी इंडिगो एअरलाईन्सचे हैद्राबाद ते गोवा या हवाई मार्गावरील विमान गोव्याच्या नव्या विमानतळावर उतरणार असून हे पहिले प्रवासी हवाई आगमन ठरणार आहे.