सुवर्ण कारागिराचे घर फोडले : कडीकोयंडा तोडून ड्रावरमधील सोने लांबविले
प्रतिनिधी /बेळगाव
जोशी गल्ली-शहापूर येथील सुवर्ण कारागिराचे 311 ग्रॅम दागिने चोरीस गेले आहेत. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून सोमवारी यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जोशी गल्ली येथील राजउल्ल रेहमान शेख या सुवर्ण कारागिराच्या इमारतीचा कडीकोयंडा तोडून मोठय़ा प्रमाणात सोने चोरण्यात आले आहे. राजउल्ल हे व्यवसायाने कारागीर आहेत. त्यांनी जोशी गल्ली परिसरात 3 मजली इमारत बांधली आहे. या इमारतीचा तळमजला फोडण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार तिसऱया मजल्यावर राजउल्ल आपल्या कुटुंबीयांसमवेत वास्तव्य करून आहेत. दुसऱया मजल्यावर त्यांचे कारागीर राहतात. तळ मजल्यात दागिने बनविले जातात. ड्रावरमध्ये ठेवण्यात आलेले 311 ग्रॅम सोने चोरटय़ांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे.
रविवारी चोरीची ही घटना उघडकीस आली. शहापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार एच., उपनिरीक्षक मंजुनाथ, एस. एन. बसवा, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रुद्राप्पा सनदी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.
राजउल्ल व त्यांचे कारागीर राहत असलेल्या दुसऱया व तिसऱया मजल्यावरील घरांना बाहेरून कडी लावून तळमजला फोडण्यात आला आहे. चोरटय़ांनी सुमारे 12 लाख 34 हजार रुपये किमतीचे सोने लांबविले असून शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. राजउल्ल हे मूळचे पश्चिम बंगालचे असल्याचे समजते.