महसूल मंडळाची चुकीची नोंद, विमा हप्ता कपात न करणे आले अंगलट
- मे अखेरची बँकांना डेडलाईन
- 41 शेतकऱयांना होणार लाभ
- भावई शेतकरी मंडळाच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी / ओरोस:
महसूल मंडळांच्या नोंदी चुकविणे आणि कर्जदार शेतकऱयांचा फळपिक विमा योजनेचा हप्ता कपात न करणे संबंधित बँकांच्या अंगलट आले आहे. जिल्हा बँकेच्या दोन शाखांसह राष्ट्रीयकृत तीन बँकांच्या पाच शाखांचा यात समावेश आहे. या बँकांनी 41 शेतकऱयांच्या बँक खाती सुमारे 32 लाखांची विमा नुकसान भरपाईची रक्कम मे अखेरपर्यंत जमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
हवामानावर आधारित फळपिक विमा योजना कर्जदार शेतकऱयांसाठी सक्तीची असून त्यांच्या विमा हप्त्याची रक्कम संबंधित बँकांनी परस्पर कपात करणे बंधनकारक आहे. मात्र काही ठिकाणी यामध्ये अनियमितता केल्याचे आढळून आले होते. तर काही बँकांनी शेतकऱयाच्या जमिनीची नोंद चुकीच्या महसूल मंडळात केल्याचे स्पष्ट झाले हेते. यामुळे अनेक शेतकरी विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते.
बँकांच्या चुकीचा फटका शेतकऱयांना बसला असल्याने भावई शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संजय सामंत यांनी याबाबत आवाज उठवत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले होते. जिल्हास्तरीय समितीने चर्चा करून संबंधित बँकांना 10 दिवसांत याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र याचा खुलासा न केला गेल्याने आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत मेअखेर संबंधित शेतकऱयांच्या बँक खाती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्याचे जिल्हाधिकाऱयांनी सूचित केले आहे. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी बँकांना तसे निर्देश दिले आहेत.
सन 2017-18 साली बॅंक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ले शाखेने 23 कर्जदार शेतकऱयांचा विमा हप्ता कपात न केल्याने 14 लाख 97 हजार 833 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतकरी नाहक भरडले!
बँकांकडून झालेल्या चुकीमुळे शेतकरी नाहक भरडला गेला असल्याची बाब जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. सोलापूर जिल्हय़ात बँकांकडून झालेल्या चुकीची वसुली त्यांच्याकडून करून घेण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. सततच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे भावई शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संजय सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान ही रक्कम जमा होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचेही संजय सामंत यांनी स्पष्ट केले.
चुकीची महसूल मंडळ नोंद (2018-19)
बँक शाखा शेतकरी रक्कम
बँक ऑफ इंडिया वेंगुर्ले 05 5,09,576
बँक ऑफ इंडिया तळवडे सावंतवाडी 02 1,93,280
सिंडिकेट बँक वेंगुर्ले 01 1,17,176
युनियन बँक मोंड 04 4,13,168
युनियन बँक सावंतवाडी 01 0,43,900
जिल्हा बँक मठ वेंगुर्ले 04 3,46,092
जिल्हा बँक कुडाळ 01 0,61,608
एवढी रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.