पुणे / वार्ताहर :
दुबई, कॅनडा यासारख्या देशांमध्ये चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 जणांची 32 लाख 62 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांवर पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसुम संदीप गायकवाड, वनराज ऊर्फ पुष्कराज बाटे, अभिजीत राजेंद्र दळवी आणि अब्दुल रौफ उमर (सर्व रा. पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत रमेश बापट (वय 33, रा. घोरपडी, पुणे) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही
संबंधित प्रकार मार्च 2022 पासून आतापर्यंत घडला आहे. तक्रारदार प्रशांत बापट हे परदेशात नोकरी शोधत होते. जस्ट डाईलवरुन त्यांनी वर्ल्ड ट्रॅव्हल्सच्या कुसुम गायकवाड यांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रारदार यांना परदेशात चांगल्या कंपनीत मोठय़ा पगाराची नोकरी लावून देतो, असे आमिष आरोपींनी दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी दहा लाख 58 हजार रुपये घेतले. अशाचप्रकारे इतर 14 जणांकडून 22 लाख चार हजार रुपये असे एकूण 32 लाख 62 हजार रुपये घेऊन कोणालाही परदेशात नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके करत आहेत.