नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पहायला मिळाले. मुंबईत पेट्रोलच्या दरात 33 पैशांनी तर डिझेलच्या दरात 37 पैशांची वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी अपडेट झालेल्या दरांनुसार दिल्लीतही पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी एका दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दर वाढल्यामुळे वाहनधारकांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त ताण कायम आहे. नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 104.22 रुपये तर डिझेल 96.16 रुपये प्रतिलिटर झाले आहे. राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी पेट्रोल 98.11 रुपये तर डिझेल 88.65 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.