चोरटय़ांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना
प्रतिनिधी/ खंडाळा
पारगांव (ता.खंडाळा) येथे बंद घराचा कोयंडा तोडून कपाटातील सोन्या चांदीचे 34 तोळे दागिने व रोख तीन लाख रुपये असा एकूण 11 लाख 64 हजारांचा माल चोरीस गेला. सदर चोरी रविवारी रात्री झाली असून या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
पारगांव (ता.खंडाळा) येथील शहीद सुनिल यादव स्मारकापासुन बावडा जाणाऱया रस्त्यावर रतन बबन भणगे यांचे घर आहे. राहत्या घराचा कोयंडा तोडून कपाट त्यातील 34 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने व तीन लाख रुपये रोख रक्कम असा माल चोरीस गेला. या घरात तीनही भावांच्या स्वतंत्र बेडरूम असून एकाच बेडरूममधील कपाट फोडले. दुसऱया बेडरूममधील कपाटे उघडीच असल्याने चोरटय़ांनी त्या कपाटांकडे लक्ष न दिल्याने त्यातील ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला नाही. रतन भणगे हे रविवारी कामानिमित्त मुंबईला गेले होते. रविवारी संध्याकाळी ते घरी येणार होते, मात्र काही कारणास्तव ते रात्री घरी येवू शकले नाहीत. रविवारी रात्री घर बंद असल्याचे पाहून चोरटय़ांनी ही चोरी केली. सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान घराचा कोयंडा तोडला असल्याचे विजय भणगे व जितेंद्र भणगे या बंधूंच्या लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता जितेंद्र भणगे यांच्या बेडरूममधील कपाट फोडल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान याच रात्री पारगांवमधील अन्य दोन ठिकाणी चोरटय़ांनी बंद घरे फोडली. मात्र त्या घरात कोणी रहात नसल्याने त्यांच्या हाती काहीच लागले नाही. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सपोनि शंकर पांगारे यांनी घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरु आहे.
काही वस्तूवरील ठसे तज्ञांनी घेतले
घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. त्या श्वानांनी महामार्गा शेजारील शहीद सुनिल यादव स्मारकापर्यंत माग काढला. ठसे तज्ञांनी घरातील काही वस्तुंवरील ठसे घेतले आहेत. घटनास्थळाला फलटणचे उपविभागिय अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट देऊन तपासा संदर्भात मार्गदर्शन केले. या घटनेत नक्की किती माल चोरीस गेला याची खातरजमा घरमालक रतन भणगे मुंबईहुन गावी आल्यानंतर करण्याचे काम सुरु सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होते. मात्र तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.