रेल्वेमार्गावरील प्राण्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात तांत्रिक बिघाड : चालक-गार्ड निलंबित
वृत्तसंस्था / टनकपूर
उत्तराखंडमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना टळली आहे. दिल्लीहून उत्तराखंडच्या टनकपूरसाठी रवाना झालेली पूर्णागिरि जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱया लोकांना रेल्वे उलटय़ा दिशेने म्हणजेच रिव्हर्समध्ये धावू लागल्यावर धक्काच बसला. रिव्हर्समध्येही रेल्वे 1 किंवा दोन किलोमीटर नव्हे तर चक्क 35 किलोमीटरपर्यंत धावली आहे. अनेक प्रवाशांना याचा थांगपत्ताच लागला नाही. दिलासा देणारी बाब म्हणजे या दुर्घटनेत कुणालाच नुकसान झालेले नाही. खटीमामध्ये रेल्वे थांबविण्यात आल्यावर प्रवाशांना बसच्या मदतीने टनकपूरपर्यंत पाठविण्यात आले.
रेल्वेमार्गावर असलेल्या प्राण्यांना वाचविण्यासाठी चालकाने अचानक बेक लावल्याने पूर्णागिरि जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि चालकाने रेल्वेवरील नियंत्रण गमाविले. याचदरम्यान रेल्वे उलटय़ा दिशेने धावू लागली. या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. असे का घडले हे शोधण्याचा प्रयत्न पथकाकडून केला जात आहे. तर लोको पायलट आणि गार्डला निलंबित करण्यात आल्याची माहिती पूर्वोत्तर रेल्वेकडून देण्यात आली आहे.
खटीमा-टनकपूर रेल्वेमार्गादरम्यान प्राण्यांमुळे एक घटना घडली आहे. खटीमा यार्डपासून काही अंतरावर रेल्वेगाडी सुरक्षितपणे रोखण्यात आली आहे. रेल्वे रुळावरून घसरली नसून सर्व प्रवाशांना सुखरुपपणे टनकपूर येथे पोहोचविण्यात आल्याचे पूर्वोत्तर रेल्वेने सोशल मीडियावर म्हटले आहे. एक आठवडय़ात उत्तराखंडमध्ये दुसऱयांदा रेल्वे दुर्घटना टळली आहे. शनिवारी दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याने पेट घेतला होता. या घटनेत कुठलाच प्रवासी जखमी झाला नव्हता. दुर्घटनेवेळी पेटता डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला होता.