ग्रामस्थांचा एकाचवेळी गायरानावर कब्जा : खडकलाट-मनोचीवाडी मार्गावरील घटना
वार्ताहर /खडकलाट
येथील खडकलाट-मनोचीवाडी मार्गानजीक असलेल्या सर्व्हे क्र. 10 व 14 मधील तब्बल 36 एकर गायरानावर 200 ते 250 नागरिकांनी रविवारी एकाचवेळी कब्जा केला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सरकारची जागा लाटण्यासाठी व कालांतराने अक्रम-सक्रमच्या नावाखाली सदर जागा अधिकृत करून घेण्यासाठी चाललेली ही धडपड पाहून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खडकलाट गावच्या पश्चिमेला मनोचीवाडी गावालगत काळभार खण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱया जागेत सुमारे 36 एकर गायरान जमीन आहे. 3-4 वर्षांपूर्वी याठिकाणी गावातील दोन मोठय़ा समाजांकडून अतिक्रमण करून दगड रोवत जागा कब्जात घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी तत्कालीन तहसीलदारांनी योग्यवेळी कडक भूमिका घेत सदर अतिक्रमण हटविले होते.
यानंतर रविवारी पुन्हा एकदा गावातील विविध समाजाच्या नागरिकांनी सदर जागेत धाव घेऊन मिळेल तेवढय़ा जागेवर डल्ला मारला आहे. यामध्ये घरे असणारे व नसणारेही सामील आहेत. काहींनी 1 गुंठा तर काहींनी 10 गुंठे जागेवर कब्जा करत मालकी सांगण्यासाठी याठिकाणी सिमेंटचे खांब उभारले. तसेच ओळख पटावी यासाठी सिमेंटच्या खांबांना रंग लावण्याची शक्कलही लढविली. खडकलाट गावातही अनेक श्रीमंतांनी अतिक्रमण केले आहे. मनोचीवाडी व पीरवाडीत तर काहींनी गायरान जमीन ताब्यात घेऊन त्यामध्ये शेती सुरू केली आहे. कांहीनी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली. सोमवारी अतिक्रमण करणाऱयांविरोधात कारवाई होणार असल्याचे समजते.