राधानगरी/ प्रतिनिधी
युती शासनाच्या काळात राज्यातील रस्ते विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने बजेटमधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यासाठी महत्वपुर्ण असणाऱ्या भोगावती कारखाना ते गैबी तिट्टा या 18 कि.मी. रस्त्यासाठी 36 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील महत्वपुर्ण असणारा व गोवा, राधानगरी धरण व दाजीपूर अभयारण्याकडे जाणारा हा रस्ता आहे. सदर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे वाहतूकीस नागरीकांना त्रास होत होता. यामुळे सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरीकांमार्फत होत होती. यामुळे सदर रस्ताचे कामास निधी मिळणेसाठी गेली अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्या यश आले असून या 18 कि.मी. रस्त्याच्या कामास 36 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गेली अनेक वर्षापासून नागरीकांची मागणी असणाऱ्या रस्त्याचे काम पुर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.