कोटय़वधी रुपयांचा जॅकपॉट लागणे ही बाब आता नवी राहिली नाही. अनेक भाग्यवंतांना असे जॅकपॉट लागले आहेत. पण त्याहीपेक्षा आनंददायक अशा जॅकपॉटची ही कहाणी आहे. आपल्यासारख्या सर्व कामकरी लोकांना सुटी ही अत्यंत प्रिय असते. आठवडाभर कित्येकजण काम करतात, ते ‘वीकली ऑफ’ वर लक्ष ठेवूनच. शिवाय हक्काच्या रजा, पगारी रजा आदी घेतल्या जातातच. काही कर्मचारी आजारी असल्याचा बहाणा करुनही वेळी अवेळी सुटी उपटतातच.
अशाच एका भाग्यवान कर्मचाऱयाला एक अनोखा जॅकपॉट लागला आहे. त्याला वर्षभर म्हणजे 365 दिवसांची भरपगारी सुटी मिळाली आहे. याचाच अर्थ असा की, त्याला वर्षभर कामावर जावे लागणार नाही. मात्र त्याचे पूर्ण वेतन त्याच्या नावे जमा केले जाणार आहे. असे त्याचे भाग्य फळफळले आहे. हा भाग्यवंत चीनच्या शेनजीन शहरातील आहे. त्याच्या कार्यालयात एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एक लकी ड्रॉ काढण्यात आला. तो याच्या नावाने लागल्ना. त्यानुसार त्याला संपूर्ण एक वर्षभर काम न करता राहता येणार होते. शिवाय त्याचे संपूर्ण वेतन त्याला मिळणार होते. या कंपनीकडून असा लकी ड्रॉ दरवर्षी काढण्यात येतो. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या उद्रेकामुळे हे शक्य झाले नव्हते. आता यंदापासून हा ड्रॉ पुन्हा काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
शिवाय त्याला दुप्पट पैसे मिळविण्याचीही सोय उपलब्ध आहे. तो आपल्या एक वर्षांच्या सुटीपैकी काही रजा एनकॅश करु शकतो. म्हणजेच, तो कामावर येऊ शकतो. या कामाचे त्याला अतिरिक्त पैसे मिळणार आहेत. म्हणजेच, पूर्वनिर्धारित वेतन तर त्याच्या नावावर येणारच आहे. शिवाय त्याला सुटीच्या एनकॅशमेंटचेही पैसे मिळणार आहेत. एकंदर सध्या तो भलताच खूष आहे.