हवामान केंद्रासाठी ग्रामपंचायतींकडून जागा निवडण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश
हवामान खात्याच्या निकषानुसार जागा निवडीचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश
तत्काळ अहवाल पाठवण्याच्या जि. प. सीईओना सूचना
कृष्णात चौगले,कोल्हापूर
सद्यस्थितीत राज्यात स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लि. या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत महावेध या प्रकल्पांतर्गत महसूल मंडळ स्तरावर एकूण 2127 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. याद्वारे प्राप्त होणाऱया हवामान विषयक माहितीचा (पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱयाची दिशा, वाऱयाचा वेग) उपयोग पिक विमा योजना, हवामान आधारित फळ पिक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन या प्रकारच्या विविध उपक्रमांसाठी होत आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांची ही संख्या मर्यादित असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार शासनाने राज्यांमध्ये वाढीव दहा हजार स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिह्यातील 368 गावांमध्ये नवीन हवामान केंद्रे उभारली जाणार आहे.
राज्यातील 29,000 ग्रामपंचायती पैकी 10 हजार ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित केली जाणार आहेत. त्यासाठी निर्धारीत तांत्रिक निकषानुसार जागा उपलब्ध करून देणाऱया दहा हजार ग्रामपंचायतीत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यानुसार हवामान खात्याच्या निकषानुसार जिह्यातील 368 ग्रामपंचायतींकडून एकत्रित प्रस्ताव मागवून ते शासनाकडे पाठवण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांना दिले आहेत. स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी करण्यासाठी जागा निवडीच्या निकषांच्या अधिन राहून ग्रामपंचायतींची निवड करून निर्धारीत निकषांनुसार जागा उपलब्धतेबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना सीईओना दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जिह्यातील हवामानाबद्दलची परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे.
हेही वाचा- थायलंडमधील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या ऐश्वर्याची बाजी
स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागा निवडीचे निकष
निवडण्यात आलेली जागा 5 मीटर ƒ 7 मीटर आणि समतल असावी. जागेभोवती मोठी झाडे किंवा इमारत असू नयेत, जवळपास मोठा जलाशय, उष्णता स्त्रोत नसावा. जवळून जाणाऱया हाय टेन्शन पॉवर केबल नसाव्यात. जागा दलदलीची अथवा पाणथळ नसावी.
वाऱ्याची दिशा आणि वेग याबाबतचे निकष
वाऱ्याची दिशा आणि वेग मोजणारा सेन्सर जमिनीपासून 3 मीटर अंतरावर उभारलेला असावा. सभोवती झाडे किंवा इमारत आदी प्रकारचे अडथळे नसावेत. असल्यास अडथळ्यांच्या उंचीच्या 10 पट अंतरावर सेन्सर उभारण्याची निश्चिती करावी. तापमान आणि आर्द्रता तापमान आणि आर्द्रता सेन्सर जमिनीपासून 1.25 मीटर ते 2 मीटर या दरम्यान उभारण्यात यावा. सभोवती असलेल्या अडथळ्यांच्या उंचीच्या चार पट अंतरावर उभारण्यात आलेला असावा. सेन्सर पासून साधारणतः 5 मीटर व्यासाचा परिसर मोकळा आणि खुला असावा. नैसर्गिक जमिन असावी. खुरट्या गवताने आच्छादलेली असावी. सेन्सर पासून सुमारे 30 मीटरच्या परिसरात काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉक बसवलेली जमीन नसावी. पर्ज्यन्यमापक यंत्र जमिनीपासून 30 सेंटीमीटर उंचीवर उभारलेले असावे. पर्ज्यन्यमापक यंत्र मोकळ्या जागेत उभारण्यात यावे. नसल्यास सभोवती असलेल्या अडथळ्यांच्या उंचीच्या चार पट अंतरावर उभारण्यात यावे.