केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : उत्पादन यापूर्वीच बंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने शासकीय कंपनी हिंदुस्थान फ्लोरोकार्बन्स लिमिटेड (एचएफएल) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीत सद्यस्थितीत 88 कर्मचारी काम करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
या कंपनीतील उत्पादन यापूर्वीच बंद पडले होते. पण 37 वर्षे जुनी असणारी कंपनी आता कागदोपत्रीही बंद झाल्याचे जावडेकर यांनी सांगितले आहे. एचएफएलची स्थापना 14 जुलै 1983 रोजी हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेडची (एचओसीएल) सहाय्यक कंपनी म्हणून झाली होती. ही कंपनी तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्हय़ातील रुद्राराम येथे आहे.
1987 मध्ये कंपनीतील उत्पादन प्रक्रिया सुरू झाली होती. पोलीटेट्रा फ्लोरो इथलिनची (पीटीएफई) निर्मिती केली जात होती. याचबरोबर कंपनी सीएफएम-22 चे उत्पादन करत होती. पीटीएफईचा वापर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज आणि एअरोस्पेस क्षेत्रात होतो. तर सीएफएम-22 चा वापर रेफ्रिजरेशनकरता होतो. एचएफएल 2013-14 पासून नुकसानीत असून त्याची उलाढाल आता नकारात्मक स्थितीत पोहोचली आहे. 31 मार्च 2019 च्या स्थितीतुसार कंपनीला 62.81 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
अन्य महत्त्वाचे निर्णय एनआयटीला वित्तीय मदत
नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विविध केंद्रांसाठी 2021-2022 पर्यंत एकूण 4371 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. विविध ठिकाणी नव्याने सुरू करण्यात आलेल्या एनआयटींच्या विकासाकरता हा निधी वापरला जाणार आहे.
दमणला राजधानीचा दर्जा
दादरा आणि नागर हवेली तसेच दमण आणि दीवचे विलीनीकरण लक्षात घेत जीएसटी, व्हॅट आणि सीमाशुल्क विषयक कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशासाठी दमण येथील मुख्यालयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.