वृत्तसंस्था/ इस्लामाबाद/कराची
पाकिस्तानमध्ये रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या बस अपघातात 11 भाविकांसह किमान 37 जण ठार झाले. तसेच काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बलुचिस्तान प्रांतातील मकरान कोस्टल हायवेवर इराणमधून 70 शिया यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर 35 भाविक जखमी झाले. बहुतेक लोक लाहोर किंवा गुजरानवालाचे रहिवासी होते. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये 35 जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने दुसरा अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुले, महिलांचा समावेश असून ते सर्व साधनोती जिल्ह्यातील रहिवासी आहेत.