वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बहरीनमध्ये होणाऱया आगामी दोन मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांसाठी शुक्रवारी फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांनी 38 संभाव्य फुटबॉलपटूंची घोषणा केली. या फुटबॉलपटूंसाठी सराव शिबिर आयोजित केले जाणार आहे.
भारत आणि बहरीन यांच्यात पहिला मित्रत्वाचा सामना 23 मार्चला बेलारुसविरुद्ध दुसरा मित्रत्वाचा सामना 26 मार्चला होणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी भारतीय फुटबॉल संघाची निवड सराव शिबिरानंतर केली जाईल. सध्या रशिया आणि युपेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे भारत आणि बेलारुस यांच्यातील 26 मार्च रोजी होणाऱया मित्रत्वाच्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
या युद्धामुळे फिफाने रशियावर बंदी घातली आहे. पण बेलारुसवर अद्याप फिफाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे. 21 मार्च रोजी भारतीय फुटबॉल संघ बहरीनला प्रयाण करेल. 2023 साली होणाऱया एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या तिसऱया फेरीतील पात्रफेरी सामन्यांसाठी भारतीय फुटबॉल फेडरेशनने पूर्व तयारीसाठी हा बहरीनचा दौरा आयोजित केला आहे. हे पात्रफेरीचे सामने कोलकाता येथे येत्या जूनमध्ये खेळविले जाणार आहेत.
घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 38 फुटबॉलपटूंच्या चमूमध्ये गोलरक्षक पी. गिल, मोहम्मद नवाज, दीपक तेंग्री, रोशन सिंग, विक्रम प्रतापसिंग, व्ही. पी. सुहेर, अंकित जाधव, एम. जेरी यांचा समावेश आहे. गुरुप्रीतसिंग संधू, अमरिंदर सिंग, धीरजसिंग, प्रीतम कोटल, आशुतोष मेहता, एस. फर्नांडिस, आशिष राय, राहुल भेके, संदेश जीनगेन, नरेंद्र गेहलोत, चिंग्लेसेना सिंग, एस. बोस, आकाश मिश्रा, मंदारराव देसाई, रोशन सिंग, उदांता सिंग, अनिरुद्ध थापा, प्रणॉय हलदार, जेक्सन सिंग, ग्लेन मार्टिन्स, बी. फर्नांडिस, अब्दुल समाद, मनवीर सिंग, लिस्टन कोलॅको, सुनील छेत्री, रहिम अली यांचा समावेश आहे.