हैदराबाद बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2019 मध्ये हैदराबाद येथे घडलेल्या सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी लाखो लोकांनी आवाज उठविला होता. या लोकांमध्ये सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन यासारखे दिग्गज कलाकार देखील सामील होते. यादरम्यान अनेकांनी सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित केली होती. बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी या बॉलिवूड कलाकारांसोबत 38 सेलिब्रिटींच्या विरोधात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी पोलिसांकडे यासंबंधी तक्रार नोंदविली आहे. यात बॉलिवूड कलाकारांसह टॉलिवूडचे कलाकार, क्रिकेटपटू आणि आरजे देखील सामील आहेत. या कलाकारांनी जनतेसाठी अनुकरणीय उदाहरण ठरायला हवे, पण ते स्वतःच कायदा मोडून बलात्कार पीडितेची ओळख उघड करत आहेत. या सर्व सेलिब्रिटींना अटक केली जावी असे गुलाटी यांचे म्हणणे आहे.
सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, अनुपम खेर, परिणीति चोप्रा, दीया मिर्झा, स्वरा भास्कर, रकुल प्रीत सिंह, यामी गौतम, ऋचा चड्ढा, काजल अग्रवाल, शबाना आझमी, हंसिका मोटवानी, प्रिया मलिक, अरमान मलिक, करणवीर वोहरा, मधुर भांडारकर, रवि तेजा, अल्लू शिरीष, क्रिकेटपटू, हरभजन सिंह, शिखर धवन, निधी अग्रवाल, चार्मी कौर, आशिका रंगनाथ आणि आरजे साइमा यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
28 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री हैदराबादमध्ये एका वेटनरी डॉक्टरचे अपहरण करण्यात आले होते. 4 आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करत तिला पेटवून दिले होते. या घटनेने देश हादरला होता. घटनेच्या दोन दिवसातच आरोपींचा एका चकमकीत खात्मा झाला होता.