महापालिका निवडणुकीतून 83 जणांची माघार, अनेक वॉर्डांमध्ये बहुरंगी लढत
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या 58 वॉर्डांमधून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी 468 जणांचे अर्ज होते. गुरुवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 83 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 385 उमेदवार शिल्लक राहिल्याने प्रत्येक वॉर्डमधील लढत चुरशीची होणार आहे. राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष उमेदवार असल्याने काही वॉर्डांमध्ये तिरंगी तर काही वॉर्डांमध्ये बहुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी असंख्य उमेदवारांनी तयारी चालविली होती. एकूण 519 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 468 जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. तसेच गुरुवारी दुपारपर्यंत 79 उमेदवारांनी अर्ज माघारी घेत निवडणुकीतून माघार घेतली. एकूण 83 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे 58 वॉर्डांमधून 385 उमेदवार निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. उमेदवारांची संख्या अधिक असल्याने चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
उमेदवारी मागे घेण्यासाठी गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी बैठका आणि चर्चांना ऊत आला होता. अर्ज मागे घेण्यासाठी दबावतंत्रासह तडजोड करण्याचे खलबत्ते बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होते. अन्य उमेदवारांना पाठिंबा दर्शवून काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. एकाच वॉर्डातून तीन ते चार उमेदवार असल्याने लढत देणे अडचणीचे आहे. परिणामी मतांची विभागणी होऊन पराजय पत्करावा लागेल त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी काहींनी भरपूर प्रयत्न चालविले होते. राष्ट्रीय पक्षांमध्ये देखील काहींनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्यावर देखील अर्ज माघारीसाठी दबाव टाकण्याचा प्रकार सुरू होता. गुरुवारी दुपारपर्यंत बैठका आणि चर्चा सुरू होत्या. दुपारी 3 पर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक होणार असल्याने भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि जेडीएस आदी पक्षांचे उमेदवार असल्याने काही वॉर्डांमध्ये तिरंगी लढत तर काही वॉर्डांमध्ये बहुरंगी लढत होणार आहे.