Tarun Bharat

4 मुस्लीमबहुल जिल्हय़ांच्या भरवशावर ममता

बंगालमध्ये भाजपला हरविण्यासाठी आटोकाट प्रयत्न

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीच्या आगामी टप्प्यांसाठी आता मुस्लीमबहुल मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण दिनाजपूरवर लक्ष केंद्रीत करत आहेत. या जिल्हय़ांमधील मतदारसंघात विजय मिळाला तरच राज्यात सरकार स्थापन करता येणार असल्याचे ममता बॅनर्जी या चार जिल्हय़ांमधील जनतेला सांगू पाहत आहेत.

उत्तर बंगालच्या कूचबिहारमधील सीतलकुचीमध्ये 10 एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला होता. तृणमूल काँग्रेस या घटनेचा वापर राजकीय प्रचारासाठी करत आहे. बंगालमध्ये अल्पसंख्याक समुदायाचा आपण एकमात्र रक्षक असल्याचे तृणमूल लोकांना सांगत आहे.

2016 च्या निवडणुकीत तृणमूलने राज्यातील 294 पैकी 211 जागांवर विजय मिळविला होता. तेव्हाही मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर आणि दक्षिण दिनाजपूरमध्ये 49 पैकी केवळ 11 जागांवर यश मिळाले होते. येथे काँग्रेसने 26 तर डाव्या पक्षांनी 10 जागा जिंकल्या होत्या.

मालदा आणि मुर्शिदाबाद या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मी परस्परांमध्ये एकजूट होण्याची विनंती करते. यंदा स्वतःची मते विभागू नका. या दोन्ही जिल्हय़ांमध्ये आणि काही अन्य ठिकाणी जागा जिंकू शकलो तर सरकार स्थापन करू शकू. बंगालमध्ये भाजप सत्तेवर येऊन आणखीन एक गुजरात तयार व्हावे अशी तुमची इच्छा आहे का असे प्रश्नार्थक विधान ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबादच्या भागबांगोला येथील सभेत बोलताना केले आहे.

अन्य राजकीय पक्ष (काँग्रेस-डावे पक्ष-भारतीय सेक्युलर मोर्चा आघाडी) लोकांकडून मते मागण्यासाठी भाजपसोबत मिळून काम करत होते असा दावा त्यांनी केला आहे. ममतांनी सोमवारी उत्तर दिनाजपूरमध्ये प्रचार केला आहे. तर मंगळवारी मुर्शिदाबाद तर बुधवारी मालदा आणि दक्षिण दिनाजपूरमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतली आहे.

उत्तर बंगालमध्ये सीतलकुची येथील घटनेनंतर काँग्रेस-डावे-आयएसएफ यांच्या आघाडीतील उत्साह वाढल्याचे तृणमूल काँग्रेसला वाटत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोरोनाबाधित झाल्याने त्यांनी राज्यातील स्वतःच्या प्रचारसभा रद्द केल्या आहेत. अशा स्थितीत तृणमूल काँग्रेस या क्षेत्रात स्वतःचा प्रभाव वाढविण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या क्षेत्रातील 49 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. या निकालाने 2021 च्या निवडणुकीत भाजपमध्ये एक नवा उत्साह दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 एप्रिल रोजी मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये जाहीरसभा घेत भाजपला संधी देण्याचे आवाहन मतदारांना करणार आहेत. भाजपने येथे काही मुस्लीम उमेदवारांना उतरविले आहे. या क्षेत्रातील अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लीम लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. तर काही मतदारसंघांमध्ये हे प्रमाण 80-90 टक्क्यांच्या आसपास आहे.

Related Stories

उद्धव ठाकरेंचे पद बेकायदेशीर; शिंदे गटाच्या वकिलाचा आयोगापुढे दावा

Abhijeet Khandekar

मला भाजपची राष्ट्रवादाची कल्पना अजूनही समजत नाही : प्रकाश राज

Abhijeet Khandekar

परदेशी लसींच्या आयातीस केंद्राची मंजुरी

datta jadhav

महिलांनाही एनडीएत प्रवेश

Patil_p

1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

datta jadhav

राजकारणात येणार नाहीत गौतम अदानी

Patil_p