अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील विचित्र प्रकार
बेघर लोकांचा निश्चित असा कुठलाच पत्ता नसतो. जेथे जागा मिळेल तेथे ते तंबू ठोकत असतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एक व्यक्ती सुमारे 4 महिन्यांपासून एका उद्यानातील झाडावर राहत आहे. मागली अनेक महिन्यांपासून मॅनहॅटनच्या रिव्हरबँक स्टेट पार्कच्या एका झाडावरच त्याने स्वतःचा निवारा तयार केला आहे. खारीप्रमाणे तो या झाडावर चढत आणि उतरत असतो.
30 फुटांवर वास्तव्य
या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर तो राहत असलेला वृक्ष 30 फूट उंचीचा आहे. हा व्यक्ती अत्यंत सहजपणे झाडावर चढतो, स्वतःचे भोजन तो झाडावरच उरकतो आणि जमिनीवर त्याचा कचरा टाकतो. परिसरातील लोकांशी तो बोलत देखील नाही आणि नेहमी रागाने इतरांकडे पाहत असतो. झाडावर त्याने एक छोटीशी झोपडी तयार केली आहे. या झोपडीतच झोपत आहे.
कपडेही तिथेच वाळवितो
एवढेच नाही तर हा व्यक्ती स्वतःचे कपडे धुवून झाडावरच वाळवत आहे. परिसरात ये-जा करणाऱया लोकांनी अनेकदा त्याचे कपडे पाहिले आहेत. या प्रकाराची माहिती महापौर एरिक ऍडम्स यांना मिळाल्यावर त्यांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली. झाडावर राहणे धोकादायक असल्याचे ऍडम्स यांनी म्हटले आहे. परंतु आता या व्यक्तीला नोटीस बजावून लवकरात लवकर झाडावरून स्वतःचे बिऱहाड गुंडाळण्यास सांगण्यात आले आहे.
सुमारे 4 महिन्यांपासून राहत असलेल्या या व्यक्तीला स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्याला ही जागा लवकरात लवकर रिकामी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच बेघर असल्याने त्याला काही शेल्टर्स होमसंबंधी माहिती देण्यात आली आहे.