शापित असल्याचा लागला कलंक
जगात असे अनेक मोठे प्रकल्प आहेत, ज्यांची मोठी चर्चा होत असते. या प्रकल्पांमध्ये इंजिनियरचे बुद्धीकौशल्य, गुंतवणुकदारांचा पैसा आणि लोकांची उत्सुकता सामील असते. परंतु अनेकदा मोठे प्रकल्प सुरू होतात, परंतु मध्येच बंद देखील पडतात. कधी मालमत्ता विवाद तर कधी अन्य कारणांमुळे हे घडत असते. असाच एक प्रकल्प अब्जावधींच्या गुंतवणुकीतून सुरू झाला, परंतु अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. याकरता कुठलाही वाद कारणीभूत ठरलेला नाही, तर लोकांनुसार हे एका शापामुळे घडले आहे.
ब्रिटनच्या हॅमिल्टन पॅलेसला घोस्ट हाउस ऑफ ससेक्स म्हटले जाते. हा प्रकल्प ब्रिटनच्या महाराणींच्या महालापेक्षाही खूप मोठा आहे. याची निर्मिती अत्यंत गाजावाजा करत झाली होती. परंतु अनेक वर्षांनंतरही तो अपूर्ण अवस्थेत आहे. या अर्धवट महालामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. अनेक जण याला भूतांचे घर मानतात. ब्रिटनमध्ये निर्माण होणाऱया सर्वात महागडय़ा इमारतींपैकी ही वास्तू ठरणार होती.
हा प्रकल्प 1985 मध्ये सुरू झाला होता. याचा आकार बकिंगहम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. परंतु आजवर तो पूर्ण होऊ शकलेला नाही. याच्या निर्मितीकरता सुमारे 4 अब्ज रुपयांचा खर्च येण्याचा अनुमान आहे. परंतु इतके पैसे गुंतवूनही येथे कुणीच राहू शकलेला नाही. आता हा महाल झाडाझुडपांनी वेढला गेला आहे. याच्या आत जाण्याची अनुमती कुणालाच नाही. येथे आतापर्यंत कुणीच राहिलेले नाही आणि भविष्यातही कुणी राहण्याची शक्यता नाही
बाहेरून पाहता येतो परिसर
या अपूर्ण महालाला पाहण्यासाठी अनेक लोक येतात. परंतु त्यांना बाहेरूनच पाहत समाधान मानावे लागते. सोशल मीडियावर या अपूर्ण महालाची काही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. याच्या परिसरात एक मोठे उद्यान तसेच कारंजे देखील आहे.