पेडणे मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा राहणार : आमदार प्रवीण आर्लेकर यांचा विश्वास


प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील चार पंचायतीमधील 4 उमेदवारांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. यात पेडणे मतदारासंघातील तोरसे व धारगळ पंचायत तर मांद्रे मतदारसंघातील हरमल व आगरवाडा चोपडे पंचायतीतील उमेदवारांचा समावेश आहे.
भाजप सरकारने केंद्र आणि राज्य सरकारने या मतदारसंघात विकास केलेला आहे. त्या विकासाच्या बळावर पुन्हा एकदा पेडणे मतदारसंघातील पंचायतीमधून भाजप समर्थक निवडून येतील, असा विश्वास पेडणे मतदारासंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी व्यक्त केला. आज बुधवारी 27 रोजी उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी काही उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजप सरकारला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, तोरसे पंचायत क्षेत्रातील प्रभाग 3 मधून प्रार्थना प्रभाकर मोटे तर इब्रामपूर -हाणखणे पंचायत प्रभाग 7 मधून दिशा गोपिनाथ हळर्णकर यांच्या विरोधात उमदेवार नसल्याने बिनविरोध निवड झाली. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी प्रार्थना मोटे यांचं पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. दिशा हळर्णकर यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी धारगळचे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, मोपाचे माजी उपसरपंच सुबोध महाले, पेडणे नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, जयेश पालेकर आदी उपस्थित होते.
मांद्रे मतदारसंघातील हरमल पंचायत प्रभाग क्र. 4 मधून बर्नाड फर्नांडिस व आगरवाडा-चोपडे पंचायतीमधून प्रभाग क्र. 4 मधून हेमंत त्रिंबक चोपडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आगरवाडा चोपडे पंचायतीमधून हेमंत चोपडेकर बिनविरोध


आगरवाडा चोपडे पंचायतीच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग 7 मधून हेमंत त्रिंबक चोपडेकर यांची बिनविरोध निवड झाली. मागच्या निवडणुकीत या प्रभागातून नरेश चोपडेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. ते काही काळ या पंचायतीचे उपसरपंचही होते. या पंचायतीत 7 प्रभाग असून प्रभाग 1, 2, व 3 महिलांसाठी, प्रभाग 5 इतर मागास वर्गीयांसाठी राखीव आहे. तर प्रभाग 3 व 4 खुले आहेत.