बसप माजी आमदाराच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना ः 50 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था / मेरठ
उत्तर प्रदेशमधील मेरठ-दौराला येथे बसपाचे माजी आमदार चंद्रवीर सिंह यांच्या शीतगृहात (कोल्ड स्टोरेज) शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. शीतगृहातील बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर गॅसगळती होऊन संपूर्ण छत कोसळले. या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून 50 ते 60 कामगार जखमी झाले. जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत मदत व बचावकार्य सुरू असले तरी चौघांना प्राण गमवावे लागल्याची माहिती देण्यात आली. या दुर्घटनेत काही कामगार ढिगाऱयाखाली दबले गेले तर काहीजण गळतीमुळे बेशुद्ध झाले. जखमी व बेशुद्ध झालेल्यांना मेरठ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बसपाचे माजी आमदार चंद्रवीर सिंह यांचे दौराला येथे शीतगृस युनिट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता शीतगृहामध्ये बॉयलरचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण शीतगृहात वायूगळती झाली. गॅस गळतीमुळे 50 हून अधिक कामगार बेशुद्ध झाल्याची माहिती आहे. या घटनेसंबंधीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिल्यानंतर मदत व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बेशुद्ध पडलेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. यादरम्यान परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक हेसुद्धा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी शहर आयुक्तांनी घटनास्थळी दाखल होत आपद्ग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली होती. दुर्घटनेनंतर जवळपास डझनभर रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. तसेच शीतगृह इमारतीच्या कोसळलेला ढिगारा उपसण्यासाठी जेसीबी व अन्य सहायक यंत्रणा पोहोचल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते.