ऑनलाईन टीम / तरुण भारत :
यवतमाळमध्ये एका कारने एसटी बसला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघाचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जण जखमी आहेत. त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
राजेश इंगोले (यवतमाळ), रजनी इंगोले (यवतमाळ), वैष्णवी गावंडे (वाशिम) आणि सारीखा चौधरी (पुसद, यवतमाळ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव आगाराची बस यवतमाळवरून अमरावतीला जात होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ एका कारने या एसटी बसला जोरदार धडक दिली. या कारमध्ये सात प्रवासी होते. त्यामधील चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नेर येथील रुग्णसेवक शंकर भागडकर, नाना घोंगडे, राजेश खोडके, प्रमोद राणे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नेर शासकीय रुग्णालयात आणले. तेथून तत्काळ त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले. अपघातात एकूण 13 जण जखमी आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक वाचा : …ही तर बोमय्यांची धमकीच