नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एअर इंडियाने विमानात एका वृद्ध महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याप्रकरणी शंकर मिश्रा याच्यावर 4 महिन्यांची बंदी घातली आहे. शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी 6 जानेवारीला बेंगळूर येथून अटक केली होती. तो सध्या तुरुंगात असून तपास प्रक्रिया सुरू आहे. एअर इंडिया एअरलाईन्सने या प्रकरणाचा अंतर्गत अहवाल दाखल केल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले.
26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-नवी दिल्ली प्रवासादरम्यान शंकर मिश्रा याने मद्यधुंद अवस्थेत आपल्यावर लघवी केल्याचा आरोप एका महिला सहप्रवाशाने केला होता. महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी 4 जानेवारीला आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या आठवडय़ात 13 जानेवारी रोजी आरोपी शंकर मिश्रा याने आपण हे आक्षेपार्ह कृत्य केले नसल्याचे दिल्लीतील न्यायालयात सांगितले होते.