प्रतिनिधी /वास्को
वास्कोत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चार युवकांना अटक केली आहे. या मुलीवर मागच्या वर्षभरापासून अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मुलीच्या कुटुंबाचा वाहन चालक प्रमुख आरोपी आहे. अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे मुकुंद रावत (35), गुरू वेंकटेश गुरूस्वामी (30), कुश जैस्वाल(30) व अफतार हुसेन (23) अशी आहेत.
या प्रकरणी वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या पालकांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मुलीचा ठावठिकाणा लागला. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या मुलीची चौकशी केली असता त्या मुलीचे अपहरण झाल्याचे व तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. काही युवकांनी तिचे अपहरण करून तिला वास्कोतच एका ठिकाणी ठेवले होते. तिच्यावर चार युवकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे अधिक तपासात उघडकीस आले.
अधिक माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी 17 वर्षांची असून तिच्या कुटुंबाचा कार चालक असलेल्या युवकानेच तिला प्रथम फुस लावून वश केले होते. मागच्या ऑगस्टमध्ये तसेच मार्चमध्ये असे दोनवेळा सदर वाहन चालकाने तिच्या लैंगिक अत्याचार केले होते. मागच्या काही दिवसांपासून तिला एका ठिकाणी ठेवून त्या चालकाच्या मित्रानीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सदर मुलगी बेपत्ता झाल्यानेच या अत्याचार प्रकरणाचे बिंग फुटले आहे. पोलिसांनी चारही संशयित युवकांविरुद्ध अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी सधन कुटुंबातील असून पीडित मुलगी व सर्व संशयित युवक वास्कोतीलच आहेत. वास्को पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.