तालुका पंचायतमध्ये वाहने दाखल, कचरा स्वच्छतेसाठी होणार वापर
प्रतिनिधी / बेळगाव
तालुक्मयातील कचरा निर्मूलनासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी छोटेखानी कचरा डेपो उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर काही ठिकाणी कचरा विघटनासाठीही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नुकतीच तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा उचल करण्यासाठी कुटुंबाला एक बकेट देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता कचरा उचलण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
घरोघरी जाऊन कचरा उचल करण्यासाठी 40 ग्राम पंचायतींना वाहने मिळणार आहेत. मात्र त्या त्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच ही वाहने ग्राम पंचायतींकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. सध्या तालुका पंचायतीच्या कार्यालयासमोर ही वाहने उभी करण्यात आली आहेत. लवकरच ती वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यक्षेत्रात एकूण 57 ग्राम पंचायती
बेळगाव तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण 57 ग्राम पंचायती आहेत. यापैकी आता 40 ग्राम पंचायतींना वाहने देण्यात येणार आहेत. तर उर्वरित 17 ग्राम पंचायतींनाही वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा पंचायतीकडे विनंती अर्ज करण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित ग्राम पंचायतींनाही तातडीने कचरा उचल वाहनांची व्यवस्था होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्या ही वाहने आली असली तरी त्याचे नियोजन अजून लावण्यात आले नाही. परिणामी यासाठी काही कर्मचाऱयांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बेळगाव तालुका पंचायतीसमोर लावण्यात आलेल्या वाहनांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. बेळगाव तालुका पंचायत कार्यक्षेत्रात तीन आमदारांचे मतदार संघ येतात. त्यामध्ये यमकनमर्डी, बेळगाव ग्रामीण व दक्षिण कार्यक्षेत्रातील संबंधित ग्राम पंचायतींना याची माहिती देण्यात आली आहे. सध्या याबाबत अनेकांना उत्सुकता लागली असली तरी कचरा गोळा करण्यासाठीच नागरिक अनुत्सुक आहेत. सध्या याबाबत वाहने आली असली तरी आमदारांकरवी ती वितरीत करण्यात येणार आहेत.