प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी राज्योत्सव मिरवणुकीत मोबाईल चोरीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या आहेत. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या 40 हून अधिक जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. आपले मोबाईल शोधून द्या, अशी मागणी करीत बुधवारी अनेक तरुण खडेबाजार पोलीस स्थानकात दाखल झाले होते.
शहरातील प्रमुख मार्गावरून राज्योत्सवाची मिरवणूक निघाली. डीजेच्या कर्कश आवाजात नृत्य करण्याच्या भरात अनेकांचे मोबाईल खाली पडले आहेत तर आणखी काही जणांचे चोरीला गेले आहेत. मिरवणूक आटोपून घरी गेल्यानंतरच मोबाईल चोरीच्या घटना त्यांच्या लक्षात आल्या आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत 40 हून अधिक जणांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. बुधवारी दिवसभर मोबाईल गमविलेल्यांची पोलीस स्थानकाबाहेर गर्दी जमली होती. प्रत्येक जण मोबाईल चोरणाऱयांच्या नावे शिवीशाप देताना दिसत होता. ही संख्या वाढण्याची शक्मयता आहे.