फिलिपाईन्स सरकारचा निर्णय ः 175 कॅसिनो केले बंद
वृत्तसंस्था/ मनीला
फिलिपाईन्सच्या कायदा विभागाने देशात बेकायदेशीर स्वरुपात असलेले 175 ऑनलाइन कॅसिनो बंद करण्याचा आणि 40 हजार चिनी कामगारांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी गँगस्टर्सनी कॅसिनो इंडस्ट्रीवर एकप्रकारे कब्जा केला असल्याने देशात गुन्हय़ांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे फिलिपाईन्स सरकारचे मानणे आहे.
बंद करण्यात आलेल्या बहुतांश कॅसिनोंच्या परवान्याची मुदत संपली होती किंवा स्थानिक प्रशासनाने हे परवाने रद्दबातल ठरविले होते. तरीही कुठलाही कर न भरता हे कॅसिनो चालविले जात होते.
ऑनलाईन कॅसिनोंना स्थानिक स्तरावर फिलिपीन ऑफशोर गेमिंग ऑपरेटर (पोगो) या नावाने ओळखले जाते. सध्या अवैध स्वरुपात पोगोशी निगडित कंपन्यांमध्ये काम करणाऱया 300 चिनी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 40 हजार चिनी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवत आहोत अशी माहिती कायदा विभागाचे प्रवक्ते डॉमिनिक क्लावानो यांनी दिली आहे.
पुढील महिन्यापासून अटक
एक पोगो कंपनी सर्वसाधारणपणे 200 चिनी कामगारांची नियुक्ती करत असते. ऑक्टोबर महिन्यापासून मोठय़ा प्रमाणावर या चिनी कामगारांना अटक करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत 3 हजार चिनी कामगारांना त्यांच्या मायदेशात परत पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. चिनी नागरिक स्वतःच्याच सहकाऱयांची हत्या, अपहरण आणि इतर गुन्हे करत असल्याचे फिलिपाईन्सच्या सरकारला एका अहवालाद्वारे समजले होते. या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सच्या कायदा विभागाने सक्रीय होत देशातील गुन्हय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी 40 हजार चिनी नागरिकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पोगोची वाढती क्रेझ
पोगोचे प्रमाण 2016 मध्ये फिलिपाईन्समध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले. या गेमिंगवर चीनमध्ये बंदी असली तरीही या ऑनलाईन गेमिंक कंपन्या अन्य देशांमध्ये स्वतःचे नेटवर्क जलदपणे निर्माण करतात. फिलिपाईन्समध्येही हेच घडले आहे. तेथील शिथिल गेमिंग कायद्याचा लाभ घेत चिनी कंपन्यांनी येथे जम बसविला. कोरोना संकटापूर्वी पोगो ऑपरेटर्सनी 3 लाखाहून अधिक चिनी कामगारांची नियुक्ती केली होती.
पोगोमुळे सरकारच्या उत्पन्नात भर
फिलिपाईन्स सरकारने 2020 मध्ये केवळ पोगोपासून मिळणाऱया शुल्कापोटी 900 कोटींहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. 2021 मध्ये हा आकडा 544 कोटी रुपये राहिला होता. कॅसिनोंचा हा खेळ 20 लाखाहून अधिक चिनी तसेच 11 लाखाहून अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळवून देतो. पोगो दरवर्षी फिलिपाईन्सच्या अर्थव्यवस्थेत 26 हजार कोटींची भर घालत आहे.