पाकिस्तानच्या बोटीसह सहा जणांवर अटकेची कारवाई
गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातच्या किनाऱयावर पाकिस्तानच्या मासेमारी करणाऱया बोटीतून अमली पदार्थांचा मोठा साठा सोमवारी जप्त करण्यात आला. ‘अल हुसेनी’ या बोटीतून 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून या हेरॉईनची किंमत तब्बल 400 कोटी रुपये आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
पकडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या बोटीत सहा क्रू सदस्य होते. भारतीय जलक्षेत्रात ही बोट पकडण्यात आल्याची माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. हेरॉईनच्या साठय़ासह बोटही जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी सर्व मुद्देमाल गुजरातमधील कच्छ जिल्हय़ातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी मुंद्रा बंदरातून तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. अफगाणिस्तानवरून दोन कंटेनरमधून आलेले हे ड्रग्ज तब्बल 15 हजार कोटी किमतीचे होते.