मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : जागतिक आयुर्वेद परिषदेचा ‘कर्टन रेझर’
प्रतिनिधी /पणजी
गोवा एक प्रमुख आयुर्वेद आणि निरोगी पर्यटन केंद्र बनविण्याच्यादृष्टीने आयुष मंत्रालयाच्यावतीने राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांबरोबरच पुढील महिन्यापासून 41 वेलनेस केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. प्राथमिक, सामुदायिक आरोग्य केंद्रावर आयुर्वेदिक थेरापिस्टची नियुक्ती करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आयुष मिशन योजनेअंतर्गत 50 खाटांची दोन आयुष रूग्णालये लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी पणजीत आयोजित केलेल्या 9व्या जागतिक आयुर्वेद परिषद व आरोग्य एक्स्पोच्या ‘कर्टन रेझर’च्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केली.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आयुष मंत्रालयाचे सचिव व्हीडी राजेश कोटेचा, राष्ट्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पी.एम. वारियर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आयुष रुग्णालयाचे डिसेंबरमध्ये उद्घाटन
धारगळ पेडणे येथील आयुष रूग्णालयाचे उद्घाटन दि. 8 डिसेंबर रोजी होईल. सर्व आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि प्रॅक्टिशनर्सना सहभागी करून राज्यात वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनाला गती दिली जाईल. आरोग्य पर्यटन क्षेत्रात गोव्याचा सर्वोत्कृष्ट कायापालट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या आयुष व्हिसाच्या लाभ प्रत्येक गोमंतकीय आयुर्वेदिक डॉक्टर्सनी घेणे आवश्यक आहे.
‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ : सोनोवाल
जागतिक आयुर्वेद परिषदेचा विषय ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ असा असून हा विषय जीवनाच्या प्रवासासाठी महत्त्वपूर्ण आहे. पारंपारिक आयुष पद्धती आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. जागतिक पातळीवर पारंपारिक औषधे त्यांच्या विश्वासार्हतेमुळे ओळखले जात आहे. गोव्याला वैद्यकीय पर्यटनाचे ठिकाण म्हणून कसे प्रोत्साहित करता येईल यासाठी जागतिक आयुर्वेद परिषदेचा लाभ घेणे आवश्यक आहे. पारंपारिक आणि आधुनिकतेच्या जोडीने मानवसेवा करणे गरजेचे आहे. हर घर हर दिन आयुर्वेदची संकल्पना घराघरात रूजणे आवश्यक असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.
आयुर्वेद परिषदेसारखे दुसरे व्यासपीठ नाही : नाईवढ
दि. 8 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत जागतिक आयुर्वेद परिषद व आरोग्य एक्स्पोचे आयोजन गोव्यात केले जात असून एक अविस्मरणीय घटना म्हणून याची नोंद होणार आहे. आयुर्वेद परिषदेसारखे दुसरे व्यासपीठ नाही. यंदा पहिल्यांदाच डब्ल्यूएचओ यात परिषदेत सहभागी होत आहे. यामुळे नक्कीच सहभागींमध्ये आवड निर्माण करेल अशी आशा मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
आयुर्वेदाने जागतिक दर्जा प्राप्त केला असून राज्य वैद्यकीय पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहेत. आयुर्वेदाला पुढे नेणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक आरोग्यप्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. येत्या काही महिन्यात एकात्मिक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार असून यात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यावेळी दिले.
आरोग्य विज्ञान म्हणजेच आयुर्वेद हे आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. याकडे जास्ततः लक्ष देणे गरजेचे आहे. आयुर्वेदचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी विज्ञान भारतीतर्फे जागतिक आयुर्वेद फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती विज्ञान भारतीचे सतीश शेणॉय यांनी यावेळी दिली.
गोव्यात दि. 8 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत होणाऱया जागतिक आयुर्वेद परिषद व आरोग्य प्रदर्शनात 9 सत्रे, 16 विषयांची सादरीकरणे, सार्वजनिक आऊटरिच कार्यक्रम होणार आहे. याशिवाय 4500 प्रतिनिधी तसेच 45 देशातील 400 हून जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील. नामांकित वैज्ञानिक, पॉलिसीमेकर्स, आयुर्वेद प्रॅक्टिशर्नस यात सहभागी होणार आहेत. औषधी वनस्पतींवर परिसंवाद होईल. आयुषची औषध प्रणाली, तसेच सुमारे 300हून स्टॉल्स यात असतील. 150 गुरू आपल्या शिष्यांसोबत संवाद साधतील अशी माहिती डब्ल्यूएचओचे पवनकुमार खोडतवार यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पी.एम. वारियर यांनी केले.
युकेच्या पर्यटकांचा व्हिसाचा प्रश्न सोडविण्यासाठी गृहमंत्र्यांना साकडे
युकेमधून गोव्यात येणारे पर्यटक चार्टर विमान रद्द झाल्यामुळे, व्हिसाचा प्रश्न एwरणीवर आला असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तो प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन शहा यांनी दिल्याचे डॉ. सावंत म्हणाले. राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत कोणताही निर्णय झाला नाही, असा खुलासा त्यांनी केला. दिल्लीतून गोव्यात परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, खाण ब्लॉक, निर्यात डय़ुटी (कर) व इतर काही गोव्याचे विषय त्यांच्याकडे मांडले. गोव्याची प्रगती-विकास याचा तपशील शहांना दिला. तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनकट यांची भेट घेतल्याचे सावंत यांनी नमूद केले.