प्रतिनिधी /पणजी
गोव्याच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात गत वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 43 टक्के वाढ नोंद झाली आहे. यंदा म्हणजेच जुलै 2022 महिन्यात गोव्यात एकुण 433 कोटी रुपये इतका जीएसटी संकलित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पातळीवर जुलै 2022 मधील जीएसटी महसूल गत वर्षीच्या याच महिन्यातील 1,16,393 कोटी रुपयांच्या तुलनेत 28 टक्के इतका जादा आहे. वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल जुलै महिन्यात 48 टक्के जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) प्राप्त महसूल गत जुलै महिन्याच्या तुलनेत 22 टक्के जास्त आहे.
जीएसटी परिषदेने मागील काळात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेले सलग पाच महिने जीएसटी महसूल संकलनात दरमहा भक्कम वाढ दर्शवत आहे. ही वाढ उत्साहवर्धक आहे. जुलै महिन्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात 22,129 कोटी रुपये इतके सर्वाधिक जीएसटी संकलन झाले आहे. गत जुलै महिन्याच्या तुलनेत त्यात 17 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.