अनेकजण लसीकरणापासून वंचित : ऑनलाईन नोंदणी होत नसल्याचे प्रशासनाचे उत्तर
प्रतिनिधी / मालवण:
केंद्र शासनाकडून सध्या कोविड ऍपद्वारे करण्यात येत असलेल्या ऑनलाईन नोंदणीद्वारे 45 वर्षीय व्यक्तींची नोंदणीच होत नसल्याने अनेकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या ऍपमध्येच याबाबत दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे. आज जिल्हय़ात मोठय़ा संख्येने 45 वर्षीय व्यक्तींना लसीकरणापासून वंचित राहवे लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले असून शासनस्तरावरून निर्णय होण्याची आवश्यकता आहे.
केंद्र शासनाने पहिल्यांदा 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले. त्यानंतर योगदिनाच्या मुहूर्तावर 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे 45 वय असलेल्या व्यक्ती या दोन्ही गटात मोडत नसल्याने जिल्हय़ातील अनेक नागरिक लसीकरणापासून दूर राहत आहेत. याबाबत अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, अद्याप ऍपमध्ये दुरुस्ती झालेली नसल्याने 45 वय असलेले नागरिक लसीकरण केंद्रावर येऊन हताशपणे माघारी परतत आहेत.
लसीकरण नोंदणीसाठी वेळ निश्चित हवी
जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या लसीकरणाचे वेळापत्रक निश्चित करताना ऑनलाईन नोंदणीसाठी हे वेळापत्रक जाहीर करण्याची वेळ निश्चित असणे आवश्यक आहे. काही वेळा सायंकाळी सात वाजता, काही वेळा रात्री दहा वाजता, तर मंगळवारी रात्री 12 वाजता ऑनलाईन नोंदणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ज्यांच्या हातात मोबाईल, त्यांनाच लसीकरणासाठी संधी मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने आपल्याकडे लस उपलब्ध झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर करण्याची वेळ एकदा जाहीर करून त्यानुसारच नियमितपणे लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे. यामुळे गावागावातील ग्रामस्थांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा गावात लसीकरणासाठी येणाऱया स्थानिक विरुद्ध इतर गावातील व्यक्ती अशी परिस्थिती सध्या सर्वत्र निर्माण झालेली दिसत आहे.
नोंदणी रद्द करण्याची संधी हवी
लसीकरण सुरू असताना एखादी व्यक्ती लस घेण्यासाठी उपलब्ध होत नसेल, तर तिला ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याची संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. जर ती व्यक्ती लसीकरणासाठी उपलब्ध न राहिल्यास त्यादिवशी ही लस शिल्लक राहते. म्हणजेच त्यावेळी जर एखाद-दुसरी व्यक्ती लसीकरणाला आली, तर तिलाही लस देणे शक्य होत नाही. यासाठी लसीकरण सुरू असताना नोंदणी रद्द करण्याचीही संधी यात समाविष्ट होणे आवश्यक आहे. तसेच शिल्लक राहिलेल्या लस इतरही व्यक्तींना देण्याचे आदेश होणे आवश्यक आहे.
अशीच नोंदणी केली, पण..! जिल्हय़ात ऑनलाईन नोंदणीसाठी युवाई मोबाईल हातात घेऊन नोंदणी करीत आहे. मात्र सायंकाळी पाचपर्यंत तेथे जाऊन लसीकरण करून घेत नाही आणि संबंधित तरुणाला याबाबत विचारणा केली असता, आपण अशीच नोंदणी केली, आता आपल्याला लस नको, असे सांगत आहेत. त्यामुळे तरुणाईचा असा बेजबाबदारपणा अनेकांना त्रासदायक ठरत आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार संपर्क साधूनही काही तरुण लसीकरणासाठी येत नसल्याचेही समोर आले आहे.