जगभरात आतापर्यंत 1,65,799 जणांचा मृत्यू ः अमेरिकेत कोराना संबंधित चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक
अमेरिकेत 1,997 बळी
अमेरिकेत दिवसभरात 1997 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा 40,565 झाला आहे. तसेच तेथे 7 लाख 64 हजार 265 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. हाच कल राहिल्यास स्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारू शकते असे उद्गार न्यूयॉर्कचे गव्हर्नर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी काढले आहेत.
सिंगापूरमध्ये 596 नवे रुग्ण
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानुसार देशात रविवारी 596 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा आता 8,014 वर पोहोचला आहे. तसेच तेथे आतापर्यंत 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. नव्या रुग्णांमध्ये 544 स्थलांतरित कामगार आहेत. या नव्या रुग्णांमध्ये भारतीय वंशीय नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.
ब्लड प्लाझ्माने उपचार
ब्रिटनमध्ये महामारीतून मुक्त झालेल्या रुग्णांच्या ब्लड प्लाझ्माद्वारे रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या ब्लड ट्रान्सप्लांट विभागाने संसर्गमुक्त लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. संसर्गमुक्त लोकांमध्ये महामारीच्या विरोधात लढण्यास मदत करू शकणारी अँटीबॉडी विकसित होत असल्याची अपेक्षा आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 16,060 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 20 हजार 067 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
न्युझीलंडमध्ये टाळेबंदी वाढली
न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी टाळेबंदीचा कालावधी 5 दिवसांनी वाढविला आहे. टाळेबंदी आता सोमवारपर्यंत कायम राहणार आहे. न्युझीलंडने संसर्गावर नियंत्रण मिळविले आहे. 28 एप्रिलपासून टाळेबंदी शिथिल केली जाऊ शकते. दुकाने हळूहळू उघडली जाऊ शकतात. समूह संसर्ग होण्याची शक्यता नसल्याचे आर्डर्न यांनी म्हटले आहे.
टाळेबंदीच्या विरोधात निदर्शने
ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी टाळेबंदीच्या विरोधात निदर्शने करणाऱया लोकांना पाठिंबा दर्शविला आहे. गव्हर्नरांकडून लादण्यात आलेली उद्योगबंदी तसेच क्वारेंटाईन दिशानिर्देश संपुष्टात आणण्याची मागणी बोल्सोनारो यांनी केली आहे. तसेच त्यांनी सैन्यशासन लागू करण्यासह सर्वोच्च न्यायालय बंद करण्याची मागणीही केली आहे.
नेत्यानाहू विरोधात आंदोलन
मास्क परिधान करून तसेच सुरक्षित अंतर राखत आणि हातात काळा झेंडा धरून इस्रायलमधील हजारो लोकांनी कठोर निर्बंधांवरून पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. या आंदोलकांनी ‘सेव्ह द डेमोक्रेसी’च्या फलकाखाली ब्ल्यू अँड व्हाईट पक्षाला नेतान्याहू यांच्या सरकारमध्ये सामील न होण्याचे आवाहन केले आहे.
दक्षिण आफ्रिकेत अन्नसंकट
दक्षिण आफ्रिकेत टाळेबंदी लागू केल्यावर अन्नसंकट निर्माण झाले आहे. अन्नाच्या तुटवडय़ामुळे युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्याचा दावा केपटाउनमधील सामाजिक कार्यकर्ते जोनी प्रेडरिक्स यांनी केला आहे. राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 5 आठवडय़ांची टाळेबंदी लागू केली आहे. लोक दुकाने लुटत असून परस्परांवर हल्ले करत आहेत.
हाँगकाँगः लोकशाही समर्थकांना अटक
हाँगकाँग पोलिसांनी 15 लोकशाही समर्थकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये जोशुआ वोंग यांचाही समावेश आहे. सद्यकाळात पूर्ण जग कोरोनाच्या विरोधात लढत आहे. अटक करण्याचा निर्णय हाँगकाँगने नव्हे तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने घेतल्याचा आरोप वोंग यांनी केला आहे.
जगभरात आतापर्यंत 24 लाख 19 हजार 724 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 65 हजार 799 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या रुग्णालयात दाखल 440 रुग्णांवर हिवतापावरील औषध हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीकरता स्वीत्झर्लंडची औषध कंपनी नोवार्टिस आणि अमेरिकेदरम्यान करार झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने अमेरिका, ब्राझील, इस्रायल, संयुक्त अरब अमिरात, पोलंड समवेत अनेक देशांना हे औषध पुरविले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 41.8 लाख लोकांची चाचणी करण्यात आली आहे.
24 तासांत जगभरात 81 हजार नवे रुग्ण
जगभरात 24 तासांमध्ये 81 हजार 153 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. तसेच दिवसभरात 6,463 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले आहेत. मागील दिवसांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या 4 हजाराने कमी असून बळींचा आकडा 247 ने घटला आहे. युरोपमध्ये 11 लाखांपेक्षा अधिक कोरोबाधित असून तेथील बळींचा आकडा 1 लाखापेक्षाही अधिक झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.