Tarun Bharat

45 वर्षांवरील सर्वांना 1 एप्रिलपासून लस

केंद्र सरकारचा निर्णय, निर्बंधांचे अधिकार राज्यांना, नव्या रूग्णसंख्येत किंचित घट

वी दिल्ली / वृत्तसंस्था

देश कोरोनाच्या दुसऱया लाटेला तोंड देत असताना, 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची योजना केंद्र सरकारने घोषित केली आहे. ही योजना 1 एप्रिलपासून अंमलात आणली जाईल. आतापर्यंत केवळ विशिष्ट विकार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जावे, असा नियम होता. मात्र, कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

नव्या घोषणेमुळे 45 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही रोगाचे प्रमाणपत्र सादर केल्याखेरीज कोरोना लस घेता येणार आहे. देशात लसींचा पुरेसा साठा असून कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने लस टोचून घेण्याची तयारी दर्शवावी. भारतात निर्माण झालेली कोव्हॅक्सिन आणि भारतात उत्पादित होत असलेली कोव्हीशिल्ड या दोन्ही लसी पूर्णतः सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांच्या गुणवत्तेसंबंधी कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्य विभागाने पुन्हा एकदा देशवासियांना केले आहे.

वाया जाण्याचे प्रमाण मोठे

देशात आतापर्यंत कोरोना लसींचे जितके डोस तयार करण्यात आले, त्याच्या साधारणतः 6.5 टक्के डोस आतापर्यंत वाया गेले आहेत. त्यांची कालमर्यादा संपल्याने ते निरूपयोगी ठरले असे सांगण्यात आले आहे. मात्र आता लस घेण्याच्या अटी काढून टाकल्याने नव्याने निर्माण करण्यात आलेले सर्व डोस उपयोगात आणले जातील, असेही सरकारने स्पष्ट केले.

निर्बंधांचे अधिकार आता राज्यांना

काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. या राज्यांमध्ये रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून काही राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आपल्या राज्यात निर्बंध घालण्यासाठी त्या राज्य सरकारांना केंद्र सरकारची अनुमती घ्यावी लागणार नाही. अंतर्गत परिस्थितीनुसार राज्य सरकारे त्यांचा निर्णय घेऊ शकतील. काही राज्यांना हा अधिकार देण्याची मागणी केली होती. ती केंद्र सरकारने आता मान्य केली आहे. स्थानिक पातळीवर लॉकडाऊन करणे आता राज्य सरकारांना शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी तसा इशारा दिला होता. केंद्र सरकारचे नवे दिशानिर्देश 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.

तीन राज्यांमध्ये बव्हंशी रूग्ण

महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नव्या रूग्णांपैकी 75 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमधील नव्या रूग्णांपैकी 62.5 टक्के रूग्ण आढळले आहेत. केरळ आणि पंजाबमध्येही नव्या रूग्णांची संख्या 5 हजार 500 पेक्षा जास्त आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकातही रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्राने या राज्यांना निशानिर्देश दिले आहेत.

नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 40 हजार

सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांच्या कालावधीत नव्या कोरोना रूग्णांची संख्या 40 हजारांहून अधिक आहे. ती कालच्यापेक्षा कमी असली तरी अद्यापही विशेष फरक पडलेला नाही. याच कालावधीत 29,324 रूग्ण बरे झाले. मात्र, गेले पंधरा दिवस उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या वाढतच असून आता ती 3 लाख 45 हजारपर्यंत पोहचली आहे. रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत 501 दिवस होता. तो आता कमी होऊन 200 दिवसांवर आला आहे. गेल्या एक महिन्यात दिवसाला सरासरी 14 टक्के या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढत असल्याने हा कालावधी कमी झाला. लसीकारणानेही वेग घेतला असून 16 जानेवारीपासून आतापर्यं एकंदर 4 कोटी 90 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

श्रीकांत त्यागीच्या घरावर ‘बुलडोझर’ कारवाई

Patil_p

लहान मुलांसह बांधकाम कामगारांवर काळाचा घाला; भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू

Kalyani Amanagi

बंगाली अभिमान अन् संस्कृती रक्षणाचा तृणमूलकडून नारा

Patil_p

‘अग्निपथ’विरोधामुळे रेल्वेचे 260 कोटींचे नुकसान

Amit Kulkarni

भारतीयांना विशेष वागणूक दिल्याचा बायडेन प्रशासनावर आरोप

Patil_p

गोरखपूर : तीन महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

prashant_c