कमी लसीकरणाचे विभाग शोधण्याचा आदेश
दिल्ली / वृत्तसंस्था
देश कोरोनाच्या दुसऱया लाटेला तोंड देत असताना, 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची योजना केंद्र सरकारने घोषित केली आहे. त्यानुसार आज, 1 एप्रिलपासून 45 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही नागरिकाला लसीकरण केंद्रावर गेल्यास लस दिली जाणार आहे. या माहिमेंतर्गत लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांसाठी विशेष लसीकरणविषयक दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार कमी लसीकरणाचे विभाग शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच देशात लसींचा पुरेसा साठा असून कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने लस टोचून घेण्याची तयारी दर्शवावी, असे आवाहनही केंद्र सरकारने केले आहे.
देशात आतापर्यंत केवळ विशिष्ट विकार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जावे, असा नियम होता. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या मोहिमेमध्ये 45 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही रोगाचे प्रमाणपत्र सादर केल्याखेरीज कोरोना लस घेता येणार आहे. भारतात निर्माण झालेली कोव्हॅक्सिन आणि भारतात उत्पादित होत असलेली कोव्हिशिल्ड या दोन्ही लसी पूर्णतः सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांच्या गुणवत्तेसंबंधी कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्य विभागाने पुन्हा एकदा देशवासियांना केले आहे.
कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले असून उद्यापासून देशातील कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. आता 45 वर्षांपुढील नागरिकांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरु झाले होते. तेव्हा पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धय़ांना लस टोचली गेली. त्यानंतर 60 वर्षांवरील नागरिकांना लच टोचण्यात येत होती. यानंतर सरकारी कर्मचारी, गंभीर आजार असेल्यांसाठी ही वयाची अट शिथिल करण्यात आली होती.
जन्मतारीख पाहूनच लसीकरण होणार
लसीकरणासाठी जाणाऱया लाभार्थ्यांसाठी जन्मतारखेची अट ठेवण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र नागरिकाचे वय हे 1 जानेवारी 2021 ला 45 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्थातच 1 जानेवारी 1977 पूर्वी सदर नागरिकाचा जन्म झालेला असणे क्रमप्राप्त आहे. तुमचा जन्म जर या तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्हाला लस मिळणार आहे. काही दिवसांनी सरकार ही अट काढून टाकण्याची शक्मयता असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
लस प्रमाणपत्रासंबंधी महत्त्वाची सूचना
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यासंबंधीचे प्रमाणपत्र न मिळाल्यास 1075 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार देता येणार आहे. महत्वाचे म्हणजे विमान प्रवासावेळी हे प्रमाणपत्र पाहिले जाणार आहे. अन्य ठिकाणीही हे प्रमाणपत्र लागू केले जाऊ शकते. हे प्रमाणपत्र डिजिटलदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर संबंधित केंद्रामधून ते लाभार्थ्यांना दिले जात आहे.