हादरवून टाकणारी घटना ः अवैध मार्गाने देशात शिरण्याच्या प्रयत्नात गमावला जीव
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेत एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेथील टेक्सास प्रांताच्या सॅन एंटोनियोमध्ये सोमवारी एका ट्रक-ट्रेलरमध्ये किमान 46 लोक मृत आढळून आले आहेत. या ट्रकमध्ये 100 हून अधिक जणांना कोंबण्यात आले होते. कायदा-अंमलबजावणी अधिकाऱयांनी या घटनेची पुष्टी दिली आहे. हा ट्रक शहराच्या दक्षिण भागाबाहेरील रेल्वेरुळानजीक आढळून आला आहे. परंतु सॅन एंटोनियोच्या पोलिसांनी अद्याप यावर कुठलीच टिप्पणी केलेली नाही.
अमेरिकेत अवैधमार्गाने शिरू पाहणारे लोक या घटनेत मृत्युमुखी पडल्याचे मानले जात आहे. अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेपासून 250 किलोमीटर अंतरावर हा ट्रक आढळून आला आहे. ट्रकमध्ये मृत आढळलेले सर्व लोक हे विदेशी नागरिक असल्याचे सिटी कौन्सिलच्या प्रमुख एड्रियाना रोचा गार्सिया यांनी सांगितले आहे.
उष्णतेने बिघडली असावी प्रकृती
सोमवारी रात्री 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात 4 अल्पवयीनांचा समावेश आहे. या सर्वांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सॅन एंटोनियो अग्निशमन विभागाने दिली आहे. हे सर्व लोक बंदिस्त ट्रकमध्ये बसले होते आणि उष्णतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असे मानले जात आहे. टेक्सासमध्ये सोमवारी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.
3 जणांना अटक
18 चाकी हा ट्रक टेक्सासच्या सॅन एंटोनियो शहरात आढळला आहे. या ट्रकच्या माध्यमातून अवैध मार्गाने लोकांची घुसखोरी घडवून आणली जात होती. ट्रक कंटेरनचे दरवाजे अधर्वट खुले होते आणि यात व्हेंटिलेशनसाठी कुठलीच व्यवस्था नव्हती. तसेच कंटेरनमध्ये पाण्याचीही सुविधा नव्हती. या दुर्घटनेप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 2017 मध्ये देखील अशाच प्रकारे 10 स्थलांतरिताचे मृतदेह टेक्सासमध्ये एका ट्रकमध्ये आढळून आले होते.
राष्ट्रीयत्व अद्याप स्पष्ट नाही
याप्रकरणी मेक्सिकोचे विदेशमंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही टेक्सासमधील मोठी शोकांतिका आहे. स्थानिक वाणिज्यिक दूतावास घटनास्थळी पोहोचत असल्याचे एब्रार्ड यांनी म्हटले आहे. मृत आढळून आलेल्या लोकांचे राष्ट्रीयत्व अद्याप समजू शकलेले नाही. अलिकडच्या महिन्यांमध्ये अमेरिका-मेक्सिको सीमेवर उच्चांकी संख्येत स्थलांतरितांनी सीमा ओलांडली आहे. या प्रकारामुळे जो बिडेन प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणावर जोरदार टीका होत आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी या मृत्यूंसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना जबाबदार ठरविले आहे.