सोन्याचे पेन, विटा, बांगडय़ाही हस्तगत : मुद्देमालामध्ये 4.31 कोटींचे सोने


कोलकाता / वृत्तसंस्था
ईडीने गेल्या चार-पाच दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये बेधडक मोहीम सुरू केली आहे. पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी सध्या ईडीच्या निशाण्यावर आहे. 23 जुलै रोजी अर्पिता मुखर्जीच्या टॉलीगंज येथील डायमंड सिटी फ्लॅटवर आणि 27 जुलै रोजी उत्तर 24 परगणा येथील बेलघारिया फ्लॅटवर छापे टाकले. पहिल्या दिवशी 26 तासांच्या छाप्यात ईडीने 21 कोटी आणि दुसऱया टप्प्यातील छाप्यात 28 कोटींची रोकड जप्त केली. बुधवार ते गुरुवारपर्यंत 18 तासांच्या छाप्यात 27.9 कोटी रुपये रोख आणि 5 किलो सोने जप्त केल्यामुळे रोख रकमेचा आकडा जवळपास 49 कोटींपर्यंत पोहोचला आहे.
रोख रकमेबाबत ईडीने विचारणा केली असता हे सर्व पैसे पार्थ चटर्जी यांचे असल्याचे अर्पिता मुखर्जीने स्पष्ट केले आहे. पार्थ चटर्जी पैसे ठेवण्यासाठी आपल्या घरांचा वापर करायचे. एवढी रोकड घरात ठेवली जाईल याची कल्पनाही मला नव्हती, असे ती पुढे म्हणाली. अर्पिताच्या घरातून सोन्याच्या विटा आणि पेनही सापडले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 4.31 कोटींचे सोने असल्याचेही सांगण्यात आले.
जप्तीसंबंधी ईडीची सविस्तर माहिती
अर्पिताने चौकशीदरम्यान रोख रकमेबाबत काहीही सांगितले नव्हते. मात्र आम्ही दुसऱया घरावर छापा टाकला तेव्हा आम्हाला 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. 2000 रुपयांच्या नोटांपासून 50 लाख रुपयांचे बंडल आणि 500 रुपयांच्या नोटांपासून 20 लाख रुपयांचे बंडल बनवण्यात आले. तसेच 4.31 कोटी रुपयांचे सोनेही मिळाले. यामध्ये प्रत्येकी 1 किलोच्या 3 सोन्याच्या विटा, 6 बांगडय़ा (सर्व 500-500 ग्रॅम) आणि एक सोन्याचा पेन सापडल्याचे ईडीच्या अधिकाऱयांनी सांगितले. एकंदर 18 तास चाललेल्या छाप्यात अर्पिताच्या फ्लॅटमधून 3 डायरीही सापडल्या असून त्यामध्ये कोडवर्डमध्ये व्यवहाराची नोंद आहे. तपास यंत्रणेने घरातून 2,600 पानांची कागदपत्रेही जप्त केली असून त्यात पार्थ आणि अर्पिताच्या संयुक्त मालमत्तेचा उल्लेख आहे.