कला, वाणिज्य शाखेच्या 6050 जागा रिक्त : अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा
प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील 31 कनिष्ठ महाविद्यालयातील 10 हजार 960 जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. प्रवेशाच्या अखेरच्या दिवशी 4910 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर 6050 ऐवढय़ा जागा रिक्त आहेत. एकूण प्रवेश पाहता अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्राध्यापकांसह शिक्षण संस्थांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेत गतवर्षीपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश व्हायचे. परंतू दरवर्षी कला शाखेच्या जागा रिक्त राहात असल्याने यंदा ऑनलाईन प्रवेशातून कला शाखा वगळण्यात आली. त्यामुळे यंदा विज्ञान व वाणिज्य शाखेच्या 10960 जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये पहिल्या आणि दुसऱया फेरीत 4910 ऐवढय़ा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. आता विज्ञान शाखेचे प्रवेश फुल्ल झाले परंतू वाणिज्य शाखेच्या मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. पारंपारिक अभ्यासक्रम पूर्ण केले तरी नोकरीची हमी नसल्याने बहुतांश विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे वळले आहेत. व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण होण्यापुर्वी नोकरीची संधी मिळतेच परंतू लाखो रूपयांचे पॅकेजही मिळते. त्यामुळे आयटीआय, पॉलिटेक्निक, पॅरा मेडीकल, फिजिओथेरपी, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र, यासह अन्य अभ्यासक्रमाला क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. परिणामी अकरावीचे वर्ग बंद पडले तर काय करायचे , असा प्रश्न प्राध्यापक व शिक्षण संस्थांसमोर उपस्थित झाला आहे.
अंतिम फेरीअखेर अकरावीचे शाखानिहाय प्रवेश
शाखा विद्यार्थी संख्या
वाणिज्य इंग्रजी 815
वाणिज्य मराठी 819
विज्ञान 3276