‘शब्दसुरांचे देणे’ मैफलीने रसिकांना रिझविले
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानात चौथा श्रावणी रविवार दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. अंतर्नाद क्रिएशन निर्मित ‘शब्दसुरांचे देणे’ ही मराठी सुगम संगीत मैफल यानिमित्ताने सादर करण्यात येऊन ती फारच रंगली. प्रसिद्ध गायक नरसिंह साने व गायिका गौतमी हेदे बांबोळकर यांनी त्यात एकापेक्षा एक सरस भाव, भक्ती, नाटय़ व सिनेगीते सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’, ‘मन लोभले’, ‘मी राधिका’, ‘नाही खर्चिली कवडी दमडी’, ‘श्रावणात घन निळा’, ‘शब्दावाचून कळले सारे’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’ ‘पांडुरंग नामी’, ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘बाई, बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला’, ‘मन हा मोगरा, अर्पूनी ईश्वरा’ अशा गीतांनी रसिकांना अक्षरशः मोहित केले. विष्णू शिरोडकर (सिंथेसाइझर), यतीन तळावलीकर (तबला), प्रा. तारानाथ होळेगद्दे (तालवाद्य), किशोर तेली (पखवाज), सुमुख केणी (टाळ) यांनी साथ दिली व प्रदीप पंडित यांनी सूत्रनिवेदन, तर रुद्रेश फोंडेकर यांनी ध्वनिव्यवस्था सांभाळली.
नंतर पालखी मिरवणूक, आरती, तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठय़ा प्रमाणात जायांच्या फुलांनी गाभारा सजविण्यात आला होता आणि देवीच्या मूर्तीचे तेज उजळून निघाले होते. मंदिरात सकाळी महाभिषेक, आरत्या व महाप्रसाद तसेच रात्रीही महाप्रसाद झाला. शेवटचा श्रावणी रविवार असल्याने भाविकांनी सकाळपासून मोठय़ा प्रमाणात देवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीचे अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई, सचिव विराज देसाई, खजिनदार दर्शन देसाई व मुखत्यार सुभाष देसाई यांनी यंदा श्रावणी रविवार उत्सवाची शिस्तबद्ध व्यवस्था केली.