फोन हॅकिंग सॉफ्टवेअरची खरेदी : सौदी अरेबियाचाही समावेश : कथित शत्रुत्व संपुष्टात
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायल आणि आखाती देशांचे संबंध आता प्रस्थापित होऊ लागले आहेत. अलिकडेच संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायलने शांतता करार केला होता. याचदरम्यान आखातातील 5 देशांनी एनएसओ या इस्रायलच्या तंत्रज्ञान कंपनीकडून फोन हॅकिंग आणि हेरगिरीकरता वापरले जाणारे सॉफ्टवेअर ‘पेगासुस’ आणि अन्य उपकरणे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबिया आणि युएईमध्ये त्यांचा वापर विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी केला जात आहे.
सौदी अरेबियाने अन्य मार्गाने 3 वर्षांपूर्वीच हे स्पायवेअर प्राप्त केल्याचे मानले जाते. 2018 मध्ये त्याचाच वापर करत सौदी सरकारविरोधी पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.
इस्रायल आणि 5 आखाती देशांमधील फोन हॅकिंग स्पायवेअरच्या व्यवहाराचा खुलासा हेराट्ज या इस्रायली वृत्तपत्राने केला आहे. सौदी अरेबिया, युएई, ओमान, बहारीन आणि कतारने एनएसओची हेरगिरी उपकरणे लाखो डॉलर्समध्ये खरेदी केली आहेत. एनएसओ ही खासगी कंपनी असून सर्वसाधारणपणे तिचे अधिकारीच व्यवहार हाताळतात. परंतु पहिल्यांदाच इस्रायलच्या नेतान्याहू सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करत आखाती देश आणि कंपनीदरम्यान मध्यस्थाची भूमिका बजावली आहे.
गुप्त व्यवहाराचा उद्देश
सौदी अरेबिया, युएई तसेच बहारीनमध्ये सरकारच्या नावावर राजघराण्याचीच सत्ता चालते आणि तेथे त्याचे अनेक विरोधकही असतात. या विरोधकांवर नजर ठेवण्यासाठीच ही उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. एनएसओचे सॉफ्टवेअर फोन हॅकिंगमध्ये सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. हे सॉफ्टवेअर कॅमेरा तसेच ऑडिओ कंट्रोल देखील करू शकते. सामग्री तर सहजपणे प्राप्त होते.
कंपनीला कुठलाही व्यवहार करण्यापूर्वी सरकारची मंजुरी घ्यावी लागते.
पुढे काय घडणार?
युएईनंतर सौदी अरेबिया तसेच अन्य देश इस्रायलशी संबंध वृद्धिंगत करू शकतात. इस्रायल पडद्याआडून होणाऱया मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अनेक देशांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सौदी अरेबियाने इस्रायल-युएई शांतता कराराचा विरोध केला असला तरीही त्याचे नेतृत्व इस्रायलच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. इस्रायल आणि अमेरिकेच्या मदतीने इराणला शह देण्याचा सौदी अरेबियाचा प्रयत्न आहे.