8 जणांसोबत जर्मनीत घडला प्रकार
काही देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर लसीकरणाचे काम सुरू झाले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपच्या काही देशांमध्ये लस देण्याचे काम सुरू आहे. याचदरम्यान जर्मनीतून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. जर्मनीत कोरोना लसीच्या ओव्हरडोसमुळे सुमारे 8 आरोग्य कर्मचाऱयांची प्रकृती बिघडली आहे.
जर्मनीच्या स्ट्रेलसंड भागात आरोग्य कर्मचाऱयांना बायोएनटेकची फायजर लस देण्यात आली. परंतु लसीचा डोस निश्चित प्रमाणापेक्षा 5 पट अधिक देण्यात आला, ज्यानंतर सुमारे 4 जणांमध्ये फ्ल्यूची लक्षणे दिसून आल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले आहे.
प्रशासनाकडून या घटनेप्रकरणी माफी मागण्यात आली आहे. हे प्रकरण केवळ एका चुकीचे आहे. या चुकीमुळे कुठलेही मोठे नुकसान होणार नसल्याची अपेक्षा असल्याचे प्रशासनाकडून म्हटले गेले आहे. या पूर्ण वादावर अद्याप लस कंपनीकडून अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
जर्मनीत यापूर्वीही लसीवरून वाद झाला होता. काही भागांमध्ये लसीचा डोस स्वीकारण्यास नकार देण्यात आला होता. लस योग्य तापमानात संग्रहित करण्यात आली नसल्याची तक्रार स्थानिक प्रशासनाने केली होती. अमेरिका, ब्रिटनमध्ये आतापर्यंत 30 लाखांहून अधिक जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकरणात अत्यंत मोठी रिऍक्शन आढळून आलेली नाही. याचमुळे लसीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.