तिरुअनंतपुरम
केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथल भगवान पद्मनाभ स्वामी मंदिर कठोर दिशानिर्देशांसह बुधवारी सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 21 मार्चपासून मंदिरात भाविकांना जाण्यास मनाई करण्यात आली होती. बुधवारी सकाळी सुमारे 200 भाविकांनी पूजा केली आहे. भाविकांसाठी सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी खुणा करण्यात आल्या आहेत. काँग्रेस आमदार व्ही. डी. सतीशन यांनीही मंदिरात जात भगवान विष्णूची पूजा केली आहे. सतीशन यांनी 24 ऑगस्ट रोजी पिनाराई विजयन सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता. दर्शनासाठी इच्छुक लोकांना एक दिवसापूर्वी मंदिराच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग करावे लागते. बुकिंगची एक प्रत आणि मूळ आधारकार्डसह मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
मंदिराच्या उत्तर दरवाज्यानजीक एक दालन स्थापन करण्यात आले आहे. या दालनातूनच भाविकांना प्रवेश करावा लागतो आणि त्यांना स्वतःचा तपशील नोंदवावा लागतो. एकावेळी केवळ 35 भाविकांना आणि एका दिवसात कमाल 665 भाविकांना मंदिरात जाण्याची अनुमती आहे. परंतु 60 वर्षांपेक्षा अधिक आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दर्शनाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून 6.45 वाजेपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.