निवडणूक आयोगाचा दौरा आजपासून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तरप्रदेश आणि पंजाब समवेत 5 राज्यांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारपासून निवडणूक आयोगाचा दौरा सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाच्या दौऱयाची सुरुवात पंजाबपासून होईल. पंजाबमध्ये दोन दिवसीय म्हणजेच 15 आणि 16 डिसेंबर रोजी आयोगाचे पथक दौऱयावर असणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा, निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनूप चंद्र पांडे यांच्यासह आयोगाचे अन्य अधिकारी पंजाबच्या दौऱयावर असतील.
निवडणूक आयोग स्वतःच्या दौऱयादरम्यान पंजाबच्या वरिष्ठ आणि पोलीस अधिकाऱयांशी चर्चा करणार आहे. निवडणूक आयोग सर्व 5 राज्यांचा दौरा करणार असून त्यानंतर तयारीचा आढावा घेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.
युपी दौरा डिसेंबर अखेरीस
निवडणूक आयोगाचे पथक उत्तरप्रदेशचा दौरा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस करणार आहे. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेत निवडणूक विषयक तयारीची समीक्षा करणार आहे. उत्तरप्रदेशात अनेक टप्प्यांमध्ये मतदान होते आणि यावेळी देखील 7 हून अधिक टप्प्यांमध्ये मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये मतदान
निवडणुकीची घोषणा जानेवारी महिन्यात होणार असून फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यादरम्यान मतदान आणि मतमोजणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेची सुरुवात जानेवारी महिन्यापासूनच होणार आहे.
राज्यनिहाय जागा
उत्तरप्रदेशच्या विधानसभेत 403 जागा, पंजाबमध्ये 117 तर गोव्यात 40, मणिपूरमध्ये 60 आणि उत्तराखंडच्या विधानसभेत 70 जागा आहेत. सर्व जागांवर 15 मार्चपूर्वी निवडणूक संपणार आहे.