पंतप्रधान मोदी देखील चाहते
मिझोरमच्या एस्टरचे युटय़ूबवर 6 लाख फॉलोअर्स
मिझोरमची एक चिमुरडी युटय़ूबवर सुपरस्टार ठरली आहे. तिच्या आवाजाच्या चाहत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील आहेत. मिझोरमच्या लुंगलेई जिल्हय़ातील एस्टर हनामतेने गायलेल्या वंदे मातरम् गाण्याला दोन वर्षांपूर्वी मोदींनी ट्विटरवर रिट्विट केले होते. हे गाणे आता नवे विक्रम रचत आहे. आतापर्यंत युटय़ूबवर या गाण्याच्या व्हिडिओला 1.3 कोटी लोकांनी पाहिले आहे.
एस्टर हनामते केवळ 5 वर्षांची असली तरीही युटय़ूबवर तिच्या ऑफिशियल पेजला 5.62 लाख लोक फॉलो करतात. एस्टरने आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. यातील सर्वाधिक चर्चा तिच्या वंदे मातरम् गाण्याला मिळाली आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्या या मूळ गाण्याचा हा रिमेक 2020 मध्ये युटय़ूबवर प्रदर्शित करण्यात आला होता. याच्या व्हिडिओत एस्टर शाळेच्या परिसरात स्वतःच्या हातात तिरंगा घेऊन गाणे गाताना दिसून येते.
एस्टरने 7 महिन्यांपूर्वी राष्ट्रगीत देखील गायले होते. मागील वर्षी 13 ऑगस्ट रोजी जारी या व्हिडिओत ती सैनिकांसोबत राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना दिसून येते. या गाण्यात एस्टरने सैन्याचा गणवेश परिधान केला होत. या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटी प्रेक्षक लाभले आहेत.