ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सत्तानाटय़ानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील गटाला प्रमुख शहरांसह विविध भागातून पाठिंबा मिळत आहे. ठाणे, कल्याण-डेंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत असतानाच आता नवी मुंबईतील आणखी पाच नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.
रामदास पवळे, रंगनाथ औटी, काशिनाथ पवार, रामचंद्र पाटील आणि ज्ञानेश्वर सुतार हे पाच नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नंदनवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला गेला. यापूर्वी नवी मुंबईतील 28 नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता.
ऐरोली पाठोपाठ आता बेलापूर मतदारसंघालाही खिंडार पडलं आहे. मीरा-भाईंदर महापालिकेचे 18 नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार आहेत. दिवसेंदिवस शिंदे गटाचा पाठिंबा वाढत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चिंता मात्र, वाढली आहे.
हेही वाचा : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती