ट्रक अन् कारची टक्कर ः केरळमध्ये भीषण दुर्घटना
वृत्तसंस्था / अलप्पुझा
केरळमध्ये इस्रोच्या 5 कर्मचाऱयांचा एका रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. इस्रोच्या कर्मचाऱयांना नेणारी कार एका ट्रकला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर 4 कर्मचाऱयांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका कर्मचाऱयाने रुग्णालयात हलविले जात असताना अखेरचा श्वास घेतला आहे.
अलप्पुझानजीक ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत प्रसाद, शिजू, अमल, सचिन आणि सुमोद यांना जीव गमवावा लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इस्रोचे कर्मचारी कारमधून तिरुअनंतपुरमच्या दिशेने प्रवास करत होते. या कारची आंध्रप्रदेशातून अलप्पुझाच्या दिशेने जाणाऱया ट्रकसोबत टक्कर झाली.
मृतांपैकी 4 जण तिरुअनंतपुरमचे रहिवासी होते, तर एक जण कोल्लमचा रहिवासी होता. मृतदेह अलप्पुझा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत. तर ट्रकचालक आणि क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.