एके-47 हस्तगत : मोठा कट उधळला
वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या क्रालपोरा भागात पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 5 सदस्यांना अटक केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून हिजबुल मुजाहिदीनचे एक दहशतवादी मॉडय़ूल क्रालपोरा भागात सक्रीय असल्याची माहिती पोलीस आणि सैन्याला मिळाली होती. हिजबुल मुजाहिदीनचे हे मॉडय़ूल दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय पुरविण्यासह रसदही पुरवित होते.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने प्रथम तीन दहशतवाद्यांना अटक केली. यात रऊफ मलिक, अल्ताफ अहमद पेयर, रियाज अहमद यांचा समावेश असून हे तिघेही क्रालपोराचे रहिवासी आहेत. चौकशीदरम्यान तिघांनीही पाकिस्तानातील दहशतवादी हँडलर फारुक अहमद पीर उर्फ नदमी उस्मानीच्या निर्देशावर हिजबुल मुजाहिदीनसाठी काम करत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या चौकशीत पीओकेतील दारूगोळय़ाचा साठा करण्यात आलेल्या दोन ठिकाणांचा शोध लागला आहे.
पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून एके रायफल, 2 एके मॅगजीन, एक पिस्तुल, 6 हँडग्रेनेड, आयईडी, 2 डेटोनेटर हस्तगत केले आहे. या दहशतवाद्यांना जून महिन्यात 6 लाख रुपये प्राप्त झाले होते. ही रक्कम शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळय़ाच्या खरेदीकरता मिळाली होती. याचबरोबर हमहामा बगडाम आणि बांदीपोरा येथून एकूण दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.