अंबडगट्टी क्रॉसजवळील घटना ः पाच जणांना अटक, कित्तूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर, बेळगाव येथील एका रहिवाशाचे गुड्स वाहन अडवून पोलीस व पत्रकार असल्याचे सांगून मोठी रोकड पळविणाऱया पाच जणांच्या एका टोळीला कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. तोतया पत्रकारांचा उपदव वाढला असून जिल्हा पोलिसांनी अशा पत्रकारांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे.
आठ दिवसांपूर्वी रामतीर्थनगर, बेळगाव येथील अताउल्ला महम्मदहयात होनगेकर यांची कार अडवून आम्ही पोलीस आहोत, तुमच्या वाहनातून गांजा वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे. तुम्ही कित्तूर पोलीस स्थानकात या, असे सांगत वाहनाची तपासणी करण्यात आली. या वाहनातील 4 लाख 79 हजार 250 रुपये पळविण्यात आले होते.
19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.15 ते 9.22 यावेळेत ही घटना घडली होती. केए 22 पी 5752 क्रमांकाच्या इंडिका कारमधून आलेल्या चालकासह पाच जणांनी हे कृत्य केले होते. अंबडगट्टी क्रॉसजवळ ही घटना घडली होती. कित्तूरजवळील पोल्ट्री फॉर्ममधून अंडी खरेदी करण्यासाठी जाताना गुड्स वाहन अडवून रक्कम पळविण्यात आली होती.
सेहलअहम्मद तरसगार (वय 41), नईम महम्मदशफी मुल्ला (वय 30), सर्वेश मोहन तुडयेकर (वय 38), बसवराज गौडाप्पा पाटील (वय 32), झाकीरहुसेन कुतबुद्दीन मनियार (वय 42) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण बेळगाव येथील वीरभद्रनगर व आझमनगर परिसरातील रहिवासी आहेत. या टोळीतील आणखी चौघेजण फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी, पोलीस उपनिरीक्षक हणमंत धर्मट्टी, उपनिरीक्षक के. एम. तल्लूर, दोडवाडचे उपनिरीक्षक प्रवीण कोटी व त्यांच्या सहकाऱयांनी या पाच जणांच्या मुसक्मया आवळल्या आहेत. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून शनिवारी रात्री त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
कृत्यासाठी वापरण्यात आलेली केए 22 पी 5752 क्रमांकाची इंडिका कार व दोन मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संशयितांनी पत्रकार असल्याचे भासविण्यासाठी तयार करण्यात आलेली दोन बोगस ओळखपत्रे पोलिसांनी जप्त केली असून पोलीस व पत्रकार असल्याचे सांगून ही लूट करण्यात आली होती. या टोळीजवळून 70 हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.