प्रयागराज / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या करण्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांची मुलगी, गर्भवती सून आणि 2 वर्षांच्या नातवंडाचा समावेश आहे. याचदरम्यान 5 वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे. हल्लेखोरांनी या घटनेदरम्यान महिलांवर अत्याचार केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेनंतर मारेकऱयांनी घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना थरवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेवराजपूर गावात घडली आहे. या भीषण हत्याकांडाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. योगी सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास लखनौ एसटीएफकडे सोपवला आहे. लखनौ एसटीएफ प्रयागराजला रवाना झाली आहे. त्याचवेळी प्रसपाचे प्रमुख शिवपाल यादव हेही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रयागराजला रवाना झाले आहेत.
राजकुमार यादव (55) यांच्यासह त्यांची पत्नी कुसुम (50), सून सविता (30), मुलगी मनिषा (25) आणि नात मीनाक्षी (2) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास राजकुमार यांच्या घरातून धूर निघत असल्यानंतर ही घटना उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. धुराचे लोट पाहून घराला आग लागल्याचा संशय ग्रामस्थांना आला. याचदरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांना पाच जणांचे रक्ताच्या थारोळय़ात पडलेले मृतदेह दिसून आले. या हत्याकांडादरम्यान मुलगा सुनील (35) हा घरात नसल्याने तर साक्षी ही पाच वर्षीय मुलगी लपून बसल्याने हल्लेखोरांच्या तावडीतून बचावल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.