हायअलर्टवर राज्याचे पोलीस
वृत्तसंस्था/ कोइम्बतूर
कोइम्बतूर पोलिसांनी रविवारी मंदिरासमोर झालेल्या कारस्फोटात 29 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्यावर 5 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावेही पोलिसांनी जाहीर केली आहेत. कारमधील स्फोट हा सिलिंडरमुळे झाला होता, परंतु स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या इसमाच्या घरातून मोठय़ा प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. मृत इसमाचे नाव जमीजा मुबीन आहे. याचदरम्यान पोलीस महासंचालक सिलेंद्र बाबू, अतिरिक्त पोलीस महासंचालक थमराय कन्न, गुप्तचर विभागाचे महानिरीक्षक सेंथिल वेलन, विशेष तपास विभागाचे अधीक्षक स्टीफन जेसुपथम यांनी कोइम्बूर येथे जात घटनास्थळाची पाहणी केली आहे.
उक्कडम येथील कोट्टाइमेदु क्षेत्रात असलेल्या जमीजा मुबीनच्या घराची झडती घेण्यात आली होती. या झडतीवेळी पोटॅशियम नायट्रेट आणि अन्य रसायने सापडली होती. या सर्वांचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला जात असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले. जमीजा मुबीन हा काही संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. पोलिसांनी आता जमीजाच्या पार्श्वभूमीची अधिक चौकशी चालविली आहे.
उक्कदम हा मुस्लीमबहुल लोकसंख्या असणारा संवेदनशील भाग आहे. उक्कदम येथील प्रसिद्ध कोट्टई ईश्वरन मंदिरानजीक कारस्फोट झाला होता. हल्ल्यानंतर पोलीस हायअलर्टवर असून कोइम्बतूर येथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या स्फोटाप्रकरणी राज्यातील द्रमुक सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.